खेड प्रतिनिधी – विजयकुमार जेठे
खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटानजीक,जैदवाडी गावच्या हद्दीत असलेल्या कारखान्याकडून पर्यावरण नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीच्या चिमणीतून सतत काळा धूर बाहेर पडत असल्यामुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यातून होणाऱ्या धूर व वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी कडक नियम असतानाही कंपनीकडून त्यांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारखान्याजवळील परिसरात प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
स्थानिक शेतकरी -:
“आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पण अजूनही काहीच होत नाही. आमच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे,” अशी भावना एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.
