भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ…
तेलंगणातील प्रखर हिंदुत्ववादी नेते आणि गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमीच्या सभेत पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषण दिले आहे.
या भाषणाने महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सभेत राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील मदरशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्राचे आमदार नितेश राणे यांच्या मदरसे बंद करण्याच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, “मी नितेश राणे यांच्या विधानाचे पूर्ण समर्थन करतो. मदरशांमध्ये देशविरोधी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. जिथे देशद्रोही तयार होतात, असे मदरसे आम्ही चालू देणार नाही. केवळ बंद करून चालणार नाही, तर या अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज आहे.” त्यांनी यावेळी दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला. “अजमल कसाबसारखे लोक मदरशातूनच तयार झाले आहेत. तिथे हिंदूविरोधी कारवाया शिकवल्या जातात,” असे ते म्हणाले.
औरंगजेब कबरीवरुन थेट आव्हान
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील औरंगजेबाच्या कबरीवरुन राजा सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना थेट आव्हान दिले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटते का? मुस्लिम समाज तुम्हाला कधीच मतदान करणार नाही, हे लिहून घ्या,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील हिंदूंना वाटते की औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधले पाहिजे. जर ही कबर हटवण्यासाठी मावळ्यांची गरज असेल, तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत.”
“प्रत्येक हिंदू घरात पाच-पाच बंदुका असाव्यात”
स्वसंरक्षण आणि धर्मरक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रे ठेवावीत, असे आवाहन करताना राजा सिंह यांनी मोठा वाद निर्माण केला. “घरात शस्त्र ठेवा, घरातील देव्हाऱ्यात शस्त्रे ठेवणे कायदेशीर आहे. ती बाहेर काढून हल्ला करणे गैरकायदेशीर आहे. जर भविष्यात युद्ध झाले आणि शस्त्र नसतील तर तुम्ही काय करणार? तुम्ही शस्त्रांशिवाय कसे लढणार?” असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले,
“धर्मासाठी लढणाऱ्यांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले तर त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार असले पाहिजे. एक एका घरात पाच पाच बंदूक असली पाहिजे.”या भाषणानंतर महाराष्ट्रात कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आधीच राजा सिंह यांना बिलोली सभेच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावली होती, तरीही त्यांच्या विधानांमुळे वाद वाढला आहे.
टी. राजा सिंह हे आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी भाषणांसाठी ओळखले जातात. यापूर्वीही औरंगजेब कबरी, मदरसे आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत.
