ठाकरे सेनेनं हर्षवर्धन सपकाळांना सुनावलं !
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचा पक्ष शिखरावर न्यायचा आहे व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व अशा पल्लेदार नेत्याकडे दिल्याने काँग्रेसचे शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न साकार होईल अशा शुभेच्छा त्यांना द्यायला हव्यात, पण विधान परिषद किंवा राज्यसभेची एखादी जागा महाविकास आघाडीत पदरात पडल्यावरच आपला पक्ष शिखरावर जाईल ही त्यांची भूमिका असेल तर शिखराची उंची पुन्हा मोजावी लागेल,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं अग्रलेखाच्या पहिल्याच दोन ओळींमध्ये लगावला आहे.
हायकमांडला काही प्रश्न विचारायला हवेत
“विषय सुरू झाला आहे तो नुकत्याच आटोपलेल्या राज्यसभा व उद्याच्या विधान परिषद निवडणुकांवरून. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी भूमिका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाराज झाले. त्यांचे सडेतोड म्हणणे असे आहे की, ”चर्चा व्हायला पाहिजे. आमच्या पक्षाचे 16 आमदार आहेत. आमचा पक्ष मविआमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही आमच्याकडूनच पाठिंबा देण्याची अपेक्षा ठेवली जाते. दरवेळी केवळ आम्ही पाठिंब्याचीच भूमिका घ्यायची काय?” असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला व त्यात काही चुकीचे नाही. सपकाळ म्हणतात, ”चर्चा व्हावी.” होय, हे खरेच आहे, पण काँगेस पक्षात चर्चा कोणाशी व्हावी हा संभ्रम कायम आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील काँग्रेस नेतृत्व कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनाही शिवसेनेप्रमाणे राज्यसभा लढायचीच होती, पण हायकमांडने शरद पवार यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्षांनी दिल्लीत जाऊन आपल्या हायकमांडला काही प्रश्न विचारायला हवेत,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं सुचवलं आहे.
…तर प्रादेशिक पक्षांना मिळणाऱ्या ‘संधी’कडे वखवखत्या नजरेने पाहू नये
“शिवसेनेचे 20 आमदार आहेत व महाविकास आघाडीत तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचा त्याग महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्या ‘इंडिया ब्लॉक’ आणि विरोधकांच्या ऐक्याबाबतच्या भाषणात ‘सर्व पक्ष समान’ असल्याचा मुद्दा अनेकदा आला आहे. प्रादेशिक पक्ष हे स्थानिक प्रश्न व भूमिपुत्रांच्या आवाजाचे लाऊड स्पीकर म्हणून काम करतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून या सगळ्यांचे नेतृत्व काँगेस करू इच्छित असेल तर प्रादेशिक पक्षांना मिळणाऱ्या ‘संधी’कडे वखवखत्या नजरेने त्यांनी पाहू नये,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही
“भारताची एकता विविधतेत आहे व प्रादेशिक पक्ष हे त्या एकतेतले आणि विविधतेतले पैलू आहेत. केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांशी फटकून वागता येणार नाही. त्यांच्याशी केलेल्या आघाड्या व युतीचा सन्मान राखला पाहिजे. मित्रपक्षांच्या भावनांचा विचार न करता एखाद्या विषयावर ‘अंतर राखणे’ हा दृष्टिकोन संकुचित ठरेल. मोठे ध्येय साध्य करण्यातला तो अडथळा ठरेल. केंद्रात सत्ता मिळवायची इच्छा मनापासून असेल तर राज्यातील मजबूत आघाडी हाच एकमेव मार्ग आहे. समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही.
ती राजकीय प्रगल्भताच ठरते. काँग्रेसने ही प्रगल्भता दाखवली तरच महाराष्ट्रासह देशभरातील प्रादेशिक पक्ष त्यांच्याकडे विश्वासाने पाहतील. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत म्हणून प्रादेशिक पक्षांचा सन्मान करतो आणि एकत्र येऊन देशाच्या भवितव्याचा विचार करतो हा संदेश काँगेसने द्यावा. एखाद्या विधान परिषद, राज्यसभेसाठी कुढत बसण्यात काय अर्थ? असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.
