खासदार पार्थ पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून इशारा !
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू आहेत.
मात्र, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. ‘काँग्रेसला भविष्यात काय त्रास होईल हे दिसेल’, असं खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
खासदार पार्थ पवार काय म्हणाले?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या संदर्भात बोलताना खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं की, “माझं कोणाशीही बोलणं झालं नाही. पण त्यांनाच कळायला पाहिजे काय-करायचं काय नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत? सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करूद्या”, असं खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.
‘काँग्रेसला भविष्यात काय त्रास होईल हे दिसेल’
“त्यांना (काँग्रेसला) नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे”, असं भाष्य खासदार पार्थ पवार यांनी केलं आहे.
बारामतीमधील सभेत बोलताना सुनेत्रा पवार भावूक
बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या. दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं.
‘चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून सहावेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहणार आहे’, अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली.
