शस्त्रसंधीच्या काळात ट्रम्प यांनी इराणला धमकी का दिली ?
अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तेहरानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, “जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकी सैन्य इराणमध्ये आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तैनात राहील. असे म्हटले आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी ‘ट्रुथआउट’ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “आपल्या आधीच कमकुवत झालेल्या शत्रूला (इराणला) नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व अमेरिकी जहाजे, विमाने, लष्करी कर्मचारी, शस्त्रे आणि इतर सर्व काही, जोपर्यंत शस्त्रसंधी कराराची पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत इराणमध्ये आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तैनात राहील.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुनरुच्चार केला की, इराणने वचन दिल्याप्रमाणे होर्मुझच्या सामुद्रधुनीचे पूर्ण कामकाज चालू ठेवले पाहिजे आणि शस्त्रसंधी करारानुसार कोणतीही अण्वस्त्रे विकसित करू नयेत. त्यांनी असेही सूचित केले की, “जर शस्त्रसंधीसाठी ठरवलेल्या अटींचे उल्लंघन झाले, तर अमेरिका एक मोठा आणि अभूतपूर्व हल्ला करू शकते.
मोठ्या हल्ल्याचा इशारा
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले, जर कोणत्याही कारणास्तव हा अंतिम करार झाला नाही, ज्याची शक्यता खूपच कमी आहे, तर अभूतपूर्व गोळीबार सुरू होईल. यावेळी आम्ही गोळ्यांचा असा वर्षाव करू की आम्ही कधीही…
मध्यपूर्वेत तणाव कायम
अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला असला तरी, मध्यपूर्वेत तणाव कायम आहे. शस्त्रसंधीवर सहमती झाल्यानंतर लगेचच इस्रायलने लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांची मालिका सुरू केली.
इस्रायली हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात २५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १,१६५ हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात एका लेबनॉनच्या इमामचाही मृत्यू झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला आहे की, इराणसोबतच्या शस्त्रसंधी करारामध्ये लेबनॉनचा समावेश केला जाणार नाही
लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचा इराणचा इशारा
इराणने लेबनॉनला शस्त्रसंधीमध्ये समाविष्ट करण्याचा आणि हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, जर लेबनॉनवरील हल्ले थांबवले नाहीत, तर इराण शस्त्रसंधी करार रद्द करेल.
त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, इराण-अमेरिका शस्त्रसंधीच्या अटी स्पष्ट आहेत. अमेरिकेने एकतर शस्त्रसंधी किंवा इस्रायलमार्फत युद्ध सुरू ठेवणे यापैकी एक निवडले पाहिजे. ते दोन्ही निवडू शकत नाही.
