मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल…
अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करून शांततादूत बनण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न त्यांच्याच एका मंत्र्यामुळे फसला आहे. युद्धबंदीनंतर इस्रायल लेबनॉनवर करत असलेल्या हल्ल्यांवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
या विधानानंतर इस्रायलने पाकिस्तानला जोरदार फटकारले असून, मध्यस्थी करणाऱ्या देशाने निष्पक्ष असायला हवं, असा म्हटलं आहे.
सध्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी शांतता चर्चा सुरू आहे. पाकिस्तान यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा दावा करत आहे. मात्र, याच दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक्सवर इस्रायलविरुद्ध टीका केली. त्यांनी इस्रायलचा उल्लेख मानवतेसाठी शाप आणि कॅन्सरसारखा देश असा केला. तसेच, ज्यांनी हा देश निर्माण केला ते नरकात जळतील, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.
इस्रायलने फटकारले
ख्वाजा आसिफ यांच्या या विधानावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “इस्रायलच्या विनाशाचे आवाहन करणे हे अत्यंत निंदनीय आहे. एखादी सरकार अशी विधाने कशी काय सहन करू शकते? विशेषतः असा देश जो स्वतःला निष्पक्ष मध्यस्थ म्हणवून घेतो, त्याच्याकडून ही अपेक्षा नाही,” अशा शब्दांत इस्रायलने पाकिस्तानवर टीका केली.
मध्यस्थीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
पाकिस्तानने या चर्चेला ऐतिहासिक राजनैतिक यश म्हटले होते. मात्र, एका बाजूला शांततेच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला एका देशाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अशी टीका इस्रायलकडून होत आहे.. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनीही आसिफ यांची टीका ‘ज्यू-विरोधी’ असल्याचे सांगत, पाकिस्तानला स्वतःच्या विनाशाची काळजी करण्याचा सल्ला दिला आहे.
लेबनानवर हल्ले सुरूच राहणार
दरम्यान, अमेरिका-इराण युद्धविराम चर्चेत लेबनानचा समावेश नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. हिजबुल्ला विरुद्धची मोहीम थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या दोन दिवसांत इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यात ३०० हून अधिक जण ठार झाले असून, यामुळे इराणनेही आता चर्चेतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.
