पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. आम जनता उन्नयन पार्टीचे अध्यक्ष हुमायूं कबीर हे भाजप नेत्यांसोबत १००० कोटी रुपयांच्या डीलवर चर्चा करत असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे.
या व्हिडिओमध्ये कबीर यांनी ममता बॅनर्जींना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केल्याचे आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये नेमके काय आहे?
१९ मिनिटांच्या या कथित व्हिडिओमध्ये हुमायून कबीर यांनी धक्कादायक दावे केले आहेत. “ममता बॅनर्जींना कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून खाली खेचायचे आहे. जर माझ्या ६०-७० जागा निवडून आल्या, तर मी उपमुख्यमंत्रीही होऊ शकतो,” असे कबीर व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. तसेच, बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी आपली चर्चा झाली असून, त्यांनी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिल्याचेही कबीर यांनी म्हटले. धक्कादायक म्हणजे, या संपूर्ण रणनीतीसाठी भाजपसोबत १००० कोटींची डील झाल्याचा उल्लेखही यात आहे.
तृणमूलची ‘ईडी’ चौकशीची मागणी
टीएमसी नेते कुणाल घोष यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या व्हिडिओवर हल्लाबोल केला. हुमायूं कबीर हे सुवेंदू अधिकारी, पंतप्रधान कार्यालय , मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या संपर्कात आहेत. जर यात पैशांच्या व्यवहाराचा उल्लेख असेल, तर ईडी गप्प का आहे? असा सवाल घोष यांनी विचारला आहे. भाजप बी टीम आणि सी टीमच्या माध्यमातून मुस्लिम आणि हिंदू मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही टीएमसीने केला.
हा तर एआय चा खेळ; कबीर यांचा पलटवार
स्वतःवर होणारे सर्व आरोप हुमायून कबीर यांनी फेटाळून लावले आहेत. “हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. टीएमसी मला बदनाम करण्यासाठी हे जाळे रचत आहे. मी हिमंता बिस्वा सरमा किंवा मोहन यादव यांना कधीही भेटलेलो नाही,” असे स्पष्टीकरण कबीर यांनी दिले. तसेच, हे आरोप सिद्ध न झाल्यास २००० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली.
ओवैसींची एआयएमआईएम आघाडीतून बाहेर
या वादाचा सर्वात मोठा फटका हुमायूं कबीर यांच्या आघाडीला बसला. असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआईएमने कबीर यांच्या पक्षाशी असलेली युती तोडली आहे. “मुस्लिमांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कोणत्याही विधानाशी आमचा पक्ष सहमत नाही,” असे सांगत ओवैसींनी बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली.
निवडणुकीवर काय परिणाम होणार?
हुमायूं कबीर यांची पार्टी २९४ पैकी ११८ जागांवर निवडणूक लढवत आहे. मुर्शिदाबाद आणि मालदा यांसारख्या मुस्लिम बहुल भागात कबीर यांचा प्रभाव आहे. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
