कॅन्सरची पोस्ट डिलीट केली…
इराणवरील हल्ले थांबले असले तरी इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धामुळे जागतिक राजकारण तापलेले असतानाच, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलवर केलेल्या एका जहरी टीकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला ‘मानवतेसाठी कलंक’ आणि ‘कॅन्सर’ संबोधणारी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आक्रमक पवित्रा घेत कडक शब्दांत फटकारल्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी तातडीने ती पोस्ट डिलीट करत माघार घेतली आहे.
ख्वाजा आसिफ यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करताना इस्रायलवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, “गाझा, इराण आणि आता लेबनॉनमध्ये इस्रायल निष्पाप लोकांची हत्या करत आहे. हा देश मानवतेसाठी शाप असून एक कॅन्सर आहे.” इतकेच नव्हे तर, ज्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमीवर हा देश वसवला ते नरकात जळतील, असे प्रक्षोभक विधानही त्यांनी केले होते.
नेतान्याहू यांचा पलटवार
या पोस्टवर इस्रायलने तीव्र संताप व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलला नष्ट करण्याचे केलेले आवाहन अत्यंत आक्षेपार्ह आहे. शांततेचा मध्यस्थ असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही सरकारकडून असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी देखील याला ‘ज्यू विरोधी’ मानसिकता असल्याचे सांगत आसिफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
पाकिस्तानचा यू-टर्न
आंतरराष्ट्रीय दबाव आणि इस्रायलच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या गोटात अस्वस्थता पसरली. अखेर कोणतीही अधिकृत माफी न मागता ख्वाजा आसिफ यांनी आपली वादग्रस्त पोस्ट ‘X’ वरून हटवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या घटनेमुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या राजनैतिक भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
