महिला आणि बाल विकास विभागात 8,669 पदांची मेगाभरती, आदिती तटकरेंची घोषणा…
राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मोठी पदभरती होणार आहे. विभागाच्या सक्षमीकरणासाठी 8 हजार 669 नियमित पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
विभागाची पुनर्रचना आणि नवीन पदे
विभागातील कामकाजाचा आढावा घेऊन काही जुनी पदे निरसित (रद्द) करण्यात आली असून, त्याऐवजी 165 नवीन पदांची भर टाकण्यात आली आहे. यामुळे आता विभागाकडे एकूण 8,669 पदे मंजूर करण्यात आली आहेत. नियमित पदांसोबतच, तातडीच्या कामकाजासाठी 2 हजार 843 पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या पदांनाही बळ
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेला अधिक बळकट करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये 1 लाख 10 हजार 664 अंगणवाडी सेविका आणि तितक्याच संख्येने अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण 2 लाख 21 हजार 328 मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला आणि बालकांच्या पोषण आणि आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.
योजनांच्या अंमलबजावणीला मिळणार गती
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, 23 वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.
