शहरातील टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात रोज नव-नवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. २०२२ पासूनच कंपनीतील एका विशिष्ट समुदयातील कर्मचाऱ्यांकडून कट्टरतेचे बीज रोवले गेले, अशी माहिती माजी कर्मचाऱ्याने एसआयटीला चौकशीत दिली आहे.
तसेच, संशयित आरोपींनी एका तरूणाचा छळही केल्याचं सांगण्यात येत आहे.
टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार, तसेच धर्मांतराचा प्रयत्न या गुन्ह्यातील आठही संशयितांच्या भोवताली फास आवळायला एसआयटीने सुरूवात केली आहे. आठही संशयितांच्या बँक खात्यांची तपासणी एसआयटीने केली आहे. त्यांना कुणा विशिष्ट व्यक्ती वा संघटनांकडून फंडिंग होत होते व का? याचाही तपास केला जात आहे. तसेच, कंपनीतील आजी आणि माजी कर्मचाऱ्यांकडून एसआयटीचे पथक माहिती गोळा करत आहे.
एसआयटीच्या पथकाला तपासात कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याने धक्कादायक माहिती सांगितली आहे. ‘२०२२ पासूनच कंपनीतील एका विशिष्ट समुदयातील कर्मचाऱ्यांकडून कट्टरतेचे बीज रोवले गेले,’ असं माजी कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.
‘सायंकाळी कंपनीचे काम संपल्यावर या प्रकरणातील संशयित अनेकदा घरी न जाता आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट स्वरूपाच्या हालचाली सुरू करत. याबाबत संबंधित महिला ऑपरेशन मॅनेजरला माहिती असूनही तिने या मुलांसाठी जणू रेड कार्पेट अंथरले होते,’ असे या माजी कर्मचाऱ्यासह सध्य कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी एसआयटीला सांगितलं आहे, असे कळते.
नाशिकमध्ये टीसीएस ही कंपनी सप्टेंबर २०१७ पासून काम करत आहे. आठ संशयितांनी एकत्रपणे एका तरूण कर्मचाऱ्याचा २०२२ पासून छळ केला आहे. सगळे गुन्हे २०२२ ते २०२६ या काळातील असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आता हे सगळे संशयित आरोपी कोणाच्या शिफारशीने कंपनीत कामाला लागले? त्यांना कंपनीतील कुणाची साथ होती? यादृष्टीने तपास सुरू आहे. ई-मेल्स, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या आणि दबावाचे पुरावे एसआयटीकडून गोळा केले जात आहेत.
याप्रकरणावर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही भाष्य केले आहे. नाशिक टीसीएसमधील प्रकरण गंभीर आणि वेदनादायी’ असून, चौकशीसाठी कंपनीने आरती सुब्रमण्यन यांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमली आहे, असे एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे
