प्रलंबित महसुली कामांसाठी एकाच छताखाली तत्काळ सेवा; नागरिकांसाठी मोठी संधी
पालघर प्रतिनिधी: मिलिंद चुरी
तारापूर : महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित कामे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकारातून तारापूर मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी कुरगाव ग्रामपंचायत येथील डॉ. होमी भाभा अणुऊर्जा सामुदायिक व बहुउद्देशीय भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
तारापूर मंडळातील एकूण ३१ महसुली गावांतील नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळणार असून ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ संकल्पनेअंतर्गत एकाच दिवशी विविध सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे तत्काळ मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या शिबिरात विविध दाखले वाटप, सातबारा (७/१२) उतारा अद्ययावत करणे, ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पडताळणी व पट्टे वाटप, ई-मोजणी व पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, तसेच महसुली अभिलेख दुरुस्तीसाठी विशेष हेल्प डेस्क उपलब्ध राहणार आहे. याशिवाय प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ॲग्रीस्टॅक व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांबाबत मार्गदर्शन, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजना आणि पुरवठा विभागाशी संबंधित विषयांवरही सेवा दिली जाणार आहे.
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा देण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांची धावपळ टाळून एकाच ठिकाणी सर्व कामे पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तारापूर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडाव्यात आणि शासनाच्या योजनांचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन महसूल विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे

