पण भारताला मोठा दिलासा !
अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार का याची भीती असताना एक मोठी घडामोडी समोर आली. ज्याने जगाचं टेन्शन वाढलं पण भारताला मात्र दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकतील, अशी भीती व्यक्त केली जात होती.
मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या यू-टर्नमुळे भारतासाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंधांमध्ये दिलेली सवलत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे इराणनेही जगाची कोंडी करणारी होर्मुझ सामुद्रधुनी सुरू केली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली; इराणची मोठी घोषणा
जगातील तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मार्ग म्हणजे ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz). इराणने या मार्गावरून सर्व व्यापारी जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. लेबनॉनमधील युद्धविरामानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी ही घोषणा केली. इराणच्या पोर्ट्स अँड मेरीटाइम ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेल्या समन्वित मार्गानुसार ही वाहतूक होणार आहे. या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले असून इराणचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळीवर आलेला ताण आता कमी होणार आहे.
अमेरिकेचा मोठा ‘यू-टर्न’; भारताची चांदी!
सर्वात महत्त्वाची घडामोड रशियन तेलाबाबत घडली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांनी रशियन तेलावरील सवलत पुढे वाढवली जाणार नाही, असे संकेत दिले होते. यामुळे भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर रशियन तेल आयात करणाऱ्या देशाचे टेन्शन वाढले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाने आता रात्रीतून मोठा निर्णय घेत या सवलतीला मुदतवाढ दिली आहे.
नव्या आदेशानुसार, १७ एप्रिल ते १६ मे या कालावधीत समुद्रात जहाजांवर असलेल्या रशियन तेलाची खरेदी करण्यास देशांना परवानगी देण्यात आली आहे. जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता पाहता अमेरिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
भारताला कसा मिळणार फायदा?
भारत हा रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा लाभार्थी राहिला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने अमेरिकेच्या सवलतीचा फायदा घेत रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात तेल खरेदी केले आहे. एका अहवालानुसार भारताने नुकतीच सुमारे ३ कोटी बॅरल रशियन तेलाची ऑर्डर दिली होती. अमेरिकेने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे भारताला आता स्वस्त रशियन तेल खरेदी करणे सुरूच ठेवता येईल. भारतासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे, कारण यामुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यास सरकारला मदत मिळणार आहे.
जगाचे टेन्शन का वाढलं?
अमेरिकेच्या या निर्णयावर काही जागतिक नेत्यांनी टीकाही केली आहे. रशिया आणि इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध यामुळे शिथिल होत असून, त्यांना आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाचे प्राधान्य सध्या जागतिक इंधन बाजार स्थिर करण्याकडे आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे पुरवठा कमी झाला होता, तो भरून काढण्यासाठी रशियन तेलाला बाजारपेठेत जागा देणे अमेरिकेला भाग पडले आहे.
पुढील मार्ग काय?
तज्ज्ञांच्या मते, इराण-अमेरिका संघर्षामुळे ऊर्जा बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी अमेरिकेकडून भविष्यात अशा आणखी सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही संधी असून, रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.
