प्रतिनिधी (नागेश पवार) ठाणे/दिवा: एकीकडे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेत प्रभागनिहाय कामांचे निर्देश देत असल्याचा गाजावाजा होत असताना, दुसरीकडे दिवा शहरातील परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ आहे. पावसाळा उंबरठ्यावर असूनही दिवा शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईला अद्याप सुरुवातही झालेली नाही. त्यातच आज मंत्रालयाने दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे दिवावासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाचा हा ढिसाळपणा शहराला यंदाही जलमय करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बैठकांचा फार्स, जमिनीवर शून्य काम
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया आणि प्रसिद्धी पत्रकांनुसार, आयुक्त सौरभ राव यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून प्रत्येक प्रभागात मान्सूनपूर्व कामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दिवा शहरातील नाल्यांकडे पाहिले असता हे आदेश केवळ कागदावरच मर्यादित असल्याचे दिसून येते. कचऱ्याने तुडुंब भरलेले नाले आणि साचलेला गाळ प्रशासनाच्या ‘आढावा बैठकीची’ पोलखोल करत आहेत.
नालेसफाईत भ्रष्टाचाराचा ‘गाळ’?
दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, स्थानिकांच्या आरोपांनुसार, प्रत्यक्ष कामापेक्षा भ्रष्टाचारच मोठा होतो. पावसाळा अगदी तोंडावर आल्यावर घाईघाईने यंत्रणा राबवून फक्त वरवरचा तरंगता कचरा काढला जातो आणि नालेसफाई झाल्याचे भासवून मोठी बिले लाटली जातात. गाळ तसाच राहिल्याने पहिल्याच पावसात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
आज मंत्रालयाकडून (मुंबई) प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही तासांत ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर आज पाऊस झाला, तर नालेसफाई न झाल्यामुळे दिवा शहर पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
—————————————————————
”दरवर्षी प्रशासन फक्त बैठका घेते, पण दिव्याच्या नाल्यातील कचरा हलत नाही. मान्सून जवळ आला की कंत्राटदार फक्त वरवरची सफाई करून पैसे लाटतात. यंदाही तीच परिस्थिती राहिली तर नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याला जबाबदार कोण?” — त्रस्त दिवा नागरिक
—————————————————————
आता प्रश्न उरतो तो इतकाच की, आयुक्तांच्या कडक निर्देशांनंतरही दिवा प्रशासन झोपले आहे का? की भ्रष्टाचाराच्या चिखलात पुन्हा एकदा सामान्यांचे हाल होणार?
