काँग्रेस खासदार प्रियांका गांधी या एकमेव व्यक्ती आहेत ज्या देश चालवू शकतात. भारताच्या माजी पंतप्रधान आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे प्रतिबिंब प्रियांका गांधींमध्ये दिसते, असे प्रतिपादन तेज प्रताप यादव यांनी केले आहे.
राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, राहुल गांधी देश चालवणार नाहीत. ते इथे-तिथे अडकून राहतील. बुलेट बाईक चालवून आणि दौरे करून काहीही साध्य होणार नाही. इथून पुढे काॅंग्रेसमध्ये जे काही घडेल् ते प्रियांका गांधींच्या मार्गदर्शनानुसारच घडेल, असेही ते म्हणाले.
तेज प्रताप यादव यांनी राहुल गांधींना सल्ला दिला की, ते सुरुवातीपासून बुलेट बाईक चालवत आहेत. त्यांची आवड अपूर्ण राहिली आहे. त्यांनी लोभ टाळावा. त्यांनी राजकारणापासून दूर रहावे. नुसता प्रवास करून किंवा भारत जोडो यात्रा करुन काहीही साध्य होणार नाही.
राहुल गांधींना परदेशात जास्त रस वाटू लागला
तेज प्रताप यांनी राहुल गांधींवर टिका करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी, जेव्हा राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले होते, तेव्हा तेज प्रताप यादव म्हणाले होते की, राहुल गांधींना परदेशात जास्त रस वाटू लागला असेल.
त्यांना भारताचा कंटाळा आला आहे. ताजी हवा घेण्यासाठी ते परदेशात जातात. पण अशा गोष्टीतून देशाचा विकास कसा साध्य होईल?
