विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वेलाचेरी येथे प्रचार संबेला संबोधित केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहशतवादी केला.
याप्रकरणी भाजपा आक्रमक झाली आहे.
चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी हे एक दहशतवादी आहेत आणि त्यांचा पक्ष समानतेच्या तत्त्वावर विश्वास ठेवत नाही. ‘एआयएडीएमके’ (AIADMK) पक्ष लोकशाहीला कमकुवत करत असून पेरियार आणि आंबेडकर यांच्या तत्त्वांच्या विरोधात काम करत आहे, असा आरोपही केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना दिसून आले.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मी त्यांना दहशतवादी म्हटले नाही. मोदी दहशत निर्माण करत आहेत, असे मी म्हटलं. मोदी केवळ दहशतीचा वापर करून लोकांना घाबरवतात असे मला म्हणायचे होते. कारण मोदी नेहमीच लोकांना धमकावतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की, आयकर विभाग आणि ईडीसारख्या सर्व संस्था त्यांच्या (नरेंद्र मोदी) नियंत्रणाखाली आहेत. मी असे कधीच म्हटले नाही की, ते स्वतः एक दहशतवादी आहेत, उलट ते लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत, अशी सारवासारव मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये दाखल झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी चेन्नई येथे सांगितले की, मोदी आणि शाह यांनी यापूर्वीही निवडून आलेले सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. गेल्या 11 वर्षांत त्यांनी आमदारांना आणि राज्यसभा खासदारांना विकत घेऊन अनेक सरकार पाडली आहेत. या व्यक्तींनी धनशक्ती आणि बाहुशक्ती या दोन्हीचा वापर केला आहे. ते आपल्या नियंत्रणाखालील संस्थां, जसे की सीबीआय, ईडी आणि आयटी गैरवापर करत आहेत आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांवर धाडी टाकण्याचे कारस्थान रचत आहेत, असा आरोप देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
