मित्रपक्ष म्हणून ‘निवडणूक आयोग’ तयारच; पश्चिम बंगालच्या कलांवर संजय राऊतांचा घणाघात…
पश्चिम बंगाल यांच्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल समोर आले आहे. या कलांनुसार या निवडणुकांमध्ये उलटफेर दिसतो आहे. पश्चिम बंगालमधील मतमोजणीच्या प्राथमिक कलांनुसार भाजपकडे सत्ता जाणार असल्याचे चिन्हं आहेत.
या निवडणुकांच्या कलांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. विशेष करून, पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी एसआयआरच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाला सुनावले.
संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दुसरं काय काम आहे. निवडणुकीत तळ ठोकणे हेच, त्यांचे काम आहे. महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत. देशात भ्रष्टाचार सुरू आहे. महागाई वाढली आहे. नोकऱ्या नाहीत. हे त्यांना दिसत नाही.
या प्रश्नांसंदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. निवडणुका(Election)कोणत्या राज्यात आल्या की, मोदी-शहा यांचं सरकार तळ ठोकूनच बसत. शेती, देशाच्या हिताचं, विकासाचं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे, हे फार काही दिसत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. मित्रपक्ष जर निवडणूक आयोग असेल, तर काहीही होऊ शकतं, असे सांगताना एसआयआरच्या माध्यमातून जवळपास 90 लाख मतदान कमी केलं आहे, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं
निवडणूक जिंकायची असेल, तर भाजप काहीही करू शकतो. पश्चिम बंगालमधून एसआयआरच्या माध्यमातून जवळपास 90 लाख मतदान कमी केलं आहे. त्याचबरोबर मतभेद ठेवलेल्या स्ट्राँग रूमवरून सीसीटीव्ही गायब केले आहेत. लाईट बंद करणे, हे असे उद्योग झालेत, याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधलं.
बारामती पोटनिवडणूक प्रमुख पक्ष नव्हते
पोटनिवडणुका या प्रतीकात्मक असतात. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामतीत कुणीही प्रमुख पक्ष लढलेला नाही. काही अपक्ष निवडणुकीला उभे राहिल्याने तिथे निवडणूक होत आहे. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.
राहुरीत कर्डिलेंच फायदा होणार
राहुरी पोटनिवडणूक ही दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर होत आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंचा होणार असल्याचे निरीक्षण देखील संजय राऊत यांनी नोंदवले.
