देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाने कोणत्या राज्यात कुणाची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पश्चिम बंगालसह तमिळनाडूमध्ये इतिहास घडला आहे.
बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सत्तेत येणार आहे, तर तमिळनाडू सुपरस्टार विजय यांनी पहिल्या निवडणुकीत भल्याभल्यांना धूळ चारली आहे. निवडणुकीत आणखी एक इतिहास घडला असून तो देशाच्या राजकीय वाटचालीतील ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
केरळमध्ये एकूण १४० जागांपैकी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सध्याच्या कलांमध्ये शंभरचा आकडा पार केला आहे. यूडीएफची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. मात्र, दुसरीकडे डाव्या पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे दहा वर्षांनंतर डाव्यांचा हा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. आता डाव्या पक्षांची देशातील एकाही राज्यात सत्ता राहिलेली नाही. देशाच्या राजकारणातील हीच ऐतिहासिक घटना ठरली आहे.
देशातील एखाद्या राज्यात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस पक्षाची सत्ता केरळ राज्यात आली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ६० जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर १९७७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आणि पुढच्याच वर्षी त्रिपुरामध्ये डाव्यांनी सत्तेत प्रवेश केला होता. ही तिन्ही राज्ये डाव्यांचे गड मानले जात होते. १९७७ नंतर पहिल्यांदाच देशातील एकाही राज्यात डाव्या पक्षांची सत्ता असणार नाही.
केरळमधील आजचा निकाल डाव्या पक्षांच्या देशातील सत्तेला सुरूंग लावणारा ठरला आहे. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये डाव्यांची फारशी ताकद राहिलेली नाही. बंगालमध्ये मागील निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नव्हता. या निवडणुकीतही तेच चित्र आहे. डाव्यांची उरलीसुरली ताकद केवळ केरळमध्ये दिसत आहे.
१९७७ ते २०११ हा काळ पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सुवर्णकाळ ठरला. त्यानंतर २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी डाव्यांचा हा सर्वात मोठा गड उद्धस्त केला. आता १५ वर्षांनी भाजपने ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसला धूळ चारली आहे. तर २०१८ पर्यंत डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपने मुसंडी घेत सत्ता मिळविली. आता केरळमध्ये काँग्रेसने डाव्यांना पराभूत केले.
आधी बंगाल, नंतर त्रिपुरा आणि आता केरळमधूनही डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. कधीकाळी केंद्रात तब्बल ६० खासदार देणाऱ्या डाव्या पक्षांची आता एकाही राज्यात सत्ता नसणे, हा डाव्या पक्षांच्या पुढील वाटचालीसाठी मोठा झटका मानला जात आहे. केरळमध्ये यूडीएफने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिथे डाव्यांना पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. त्रिपुरा आणि बंगालमध्येही डावे आता सत्तेपासून खूप दूर गेले आहेत.
