इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क !
पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा विझवण्यासाठी इराणने आता एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे १४ कलमी शांतता प्रस्ताव धाडला आहे.
या प्रस्तावाचा मुख्य उद्देश सुरू असलेले युद्ध कायमस्वरूपी थांबवणे हा आहे. मात्र, ट्रम्प यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, “आम्ही विचार करत आहोत, पण इराणसोबत करार होईलच याची खात्री नाही,” असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे.
काय आहे इराणचा ‘१४ कलमी’ प्लॅन?
इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेने आधी दिलेल्या ९ कलमी योजनेला प्रत्युत्तर मानले जात आहे. इराणच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील ३० दिवसांत सर्व वाद मिटवून युद्ध कायमस्वरूपी संपवणे, भविष्यात अमेरिकेने इराणवर हल्ला करू नये, याची लेखी हमी, इराणच्या सीमांजवळून अमेरिकन सैन्य मागे घेणे, जप्त केलेली इराणची संपत्ती परत करणे आणि निर्बंध उठवणे, युद्धाच्या नुकसानीची भरपाई आणि लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्धबंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युरेनियम संवर्धनाचा अधिकार अबाधित राखणे, या मागण्या आहेत.
ट्रम्प यांची ‘रेड लाईन’ आणि होर्मुझचा पेच
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अटींवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणची परमाणु क्षमता ही अमेरिकेसाठी ‘रेड लाईन’ आहे. इराणने आपली अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे सोडावी, अशी अमेरिकेची मागणी आहे. दुसरीकडे, इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वर केलेली नाकेबंदी मागे घ्यावी, तरच चर्चा पुढे सरकेल, असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. मात्र, इराण या दोन्ही मुद्द्यांवर माघार घेण्यास तयार नाही.
“चूक केली तर पुन्हा बॉम्ब टाकू!”
फ्लोरिडा येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत इराणला इशारा दिला. ते म्हणाले, “इराण सध्या करार करण्यासाठी हतबल आहे कारण नाकेबंदीमुळे त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही प्रस्तावावर लक्ष ठेवून आहोत, पण जर त्यांनी काहीही वाईट’ करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका पुन्हा हल्ले सुरू करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.”
युद्धाची सद्यस्थिती
८ एप्रिलपासून पाकिस्तानच्या मध्यस्थीने युद्धविराम लागू झाला असला तरी परिस्थिती अद्याप तणावपूर्ण आहे. समुद्रात दोन्ही देशांचे नौदल एकमेकांवर हल्ले करत आहेत आणि जहाजे ताब्यात घेण्याचे सत्र सुरूच आहे. आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात असून, ट्रम्प इराणचा हा ‘१४ कलमी’ प्रस्ताव स्वीकारतात की फेटाळतात, यावर जगाचे भवितव्य अवलंबून आहे.
