तमिळनाडूमध्ये मोठी राजकीय उलथापलथ होण्याची शक्यता…
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय जोसेफ यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने १०८जागा जिंकल्या आहेत. तरीही त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे सत्तास्थापनेसाठी विजय यांनी दोनवेळा राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली.
मात्र, बहुमत सिध्द करण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याशिवाय आमंत्रित केले जाणार नाही, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे DMK आणि AIADMK हे दोन एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे
त्यामुळे जर हे दोन पक्ष एकत्र आले तर तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. शिवाय विजय यांचं सत्तास्थापनेचं स्वप्न अपूर्णच राहू शकतं. अशातच DMK आणि AIADMK एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होताच विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी सर्वात मोठा इशारा दिला आहे.
‘जर डीएमके आणि एआयएडीएमके’ने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर टीव्हीकेचे सर्व 108 आमदार सामूहिक राजीनामा देतील’, असा इशारा टीव्हीकेच्या नेत्यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे तमिळनाडूतील राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून ते अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
तमिळनाडूच्या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकल्या आहेत. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी विजय जोसेफ यांना आणखी 10 आमदारांची गरज आहे. अशातच काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्याकडील आमदारांचं संख्याबळ 113 पर्यंत पोहोचलं आहे. मात्र, अद्याप त्यांना 5 आमदारांची गरज आहे.
113 आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्तास्थापनेचा दावा देखील केला होता. मात्र, राज्यपालांनी नियमावर बोट ठेवत 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन या, असं सांगितलं आहे. त्यामुळे अद्याप त्यांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलेलं नाही.
विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं नसतानाच दुसरीकडे डीएमके आणि एआयएडीएमकेने एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता टीव्हीकेच्या नेत्यांनी 108 आमदारांचा सामुहीक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
