पश्चिम बंगालमधील जनतेला गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार, दहशतवाद नको आहे. पंतप्रधान मोदी यांचं नेशन फस्ट पण विरोधकांचं करप्शन फस्ट असं होतं. सुवेंदू अधिकारी हे डॅशिंग अधिकारी आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या दहशतवादाकडे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रथमच भाजपा सत्तेत आली आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा भाजपानं पराभव केला. त्यानंतर आज (शनिवार, 9 मे) पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“पश्चिम बंगालमधील आजचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच भाजप, एनडीएचा विजय झाला आहे. त्यामुळे मोठा आनंद झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे. देशाला विकसीत आणि आर्थिक महासत्ता बनवण्याचं ठरवलं आहे, त्यावर जनतेनं विश्वास दाखवला आहे. भीती आणि विश्वास ही लढाई होती. या निवडणुकीत भीती हारली आणि विश्वास जिंकला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पश्चिम बंगालमधील मायक्रो मॅनेजमेंट कामाला आलं आहे. गेल्या आठ ते दहा वर्ष मेहनत करत रणनीती तयार केली. त्यामुळे एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला. तसेच, अमित शाह यांनी पुन्हा एकदा भाजपचा चाणक्य म्हणून स्वताला सिद्ध केलं आहे. डबल इंजिनचे सरकार आता पश्चिम बंगालमध्ये आलेलं आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“पश्चिम बंगालमधील जनतेला गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार, दहशतवाद नको आहे. पंतप्रधान मोदी यांचं नेशन फस्ट पण विरोधकांचं करप्शन फस्ट असं होतं. त्यामुळं गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार, दहशतवादाला जनतेनं नाकारलं आहे. तसेच, विकास, प्रगती आणि विश्वासाला लोकांनी स्वीकारलं. पश्चिम बंगालमध्ये आता डबल इंजिनचे सरकार काम करेल, रोजगार मिळेल नवनवीन इंडस्ट्रीज बंगालमध्ये येतील. लोकांच्या हाताला काम मिळेल. पायाभूत सुविधाही वाढतील. तसेच, बॅकफूटला गेलेला बंगाल असलेली ओळख पुसली जाईल”, अशा शब्दांत शिंदेंनी बंगालच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली.
“सुवेंदू अधिकारी हे डॅशिंग अधिकारी आहेत. ममता बॅनर्जी यांच्या दहशतवादाकडे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. पश्चिम बंगालच्या एनडीएच्या कार्यकत्यांनी गुंडाराजसमोर लाठ्याकाट्या खाल्ल्या मागे हटले नाहीत”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
