पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रथमच भाजपा सत्तेत आली आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा भाजपानं पराभव केला.
त्यानंतर आज (शनिवार, 9 मे) पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र या शपथविधी सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली आहे, त्याबद्दल, त्या कनिस्ट्न्सीबद्दल त्यांच अभिनंदन केलं पाहिजे, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यानुसार, “भारतीय जनता पक्षाने आपली परंपरा कायम राखली आहे. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रीपदी किंवा मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवली. 2020 च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्यांच्यामध्ये सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. या धाडी टाकायला सुरूवात झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री बनत आहेत, अस म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
“मी तो व्हिडीओ टाकणार आहे. पण भाजपचे नेते असलेले सुवेंदू अधिकारी, बंगालचे मुख्यमंत्री बनणारे सुवेंदू अधिकारी हे आजही त्या वॉशिंग मशीनमध्येच फिरत आहेत. तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही. ते सरळ असे पैसे स्वीकारतात. अशा माणसाला राज्याचं मुख्यमंत्री पदत देत आहेत. परिणामी भाजपनं भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली, त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे, असा सणसणीत उपरोधिक टोला संजय राऊत यांनी हाणला.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचं निकाल 4 मे रोजी लागले. भाजपला तिथे न भूतो न भविष्यी असं दणदणीत यश मिळालं. ममता बॅनर्जींचा, त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा सणकून पराभव झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता येत आहे. आज भाजप सरकारचा शपथविधी सोहळा असून राजधानी कोलकाता येथे सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार असून या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य व देशातील अनेक महत्वाचे नेतेही या शपथविधी सोहळ्यास हजेरी लावणार आहेत.
मात्र याच शपथविधीवरून आणि भाजपच्या सत्तास्थापनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
