राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत विलास लवांडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
आळंदी मतोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर गाडी अडवून अंगावर शाही फेकून धक्काबुक्की करून पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा गंभीर आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले विकास लवांडे?
आज सकाळी मी प्रवचनाला जात असताना मला संग्राम भंडारे आणि १० ते १५ गोरक्षकानी पकडले आणि माझ्या अंगावर शाई फेकली आणि मला मारहाण केली, अशी माहिती विकास लवांडे यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.
“सर्वांनी आत्ता लोणीकाळभोर पोलिस स्टेशनला यावे. वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे”. असे पोस्टद्वारे विलास लवांडे म्हणाले आहेत.
रोहित पवारांनी ट्वीट करत केली ही मागणी
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी”. असे ट्वीट रोहित पवारांनी एक्सवरुन केला आहे.
