सुवेंदूंच्या शपथविधीआधी PM मोदी पडले पाया, वाकून केला नमस्कार…
पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आज भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ब्रिगेड परेड मैदानावर भव्य अशा शपथविधी सोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर पोहोचताच त्यांनी माखनलाल सरकार यांना नमस्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माखनलाल सरकार यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला आणि नंतर गळाभेटही घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह माखनलाल सरकारही भावुक झाले.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री विराजमान झाला. यावेळी ९८ वर्षीय माखनलाल सरकार हे व्यासपीठावर होते. त्यांचा सत्कारही व्यासपीठावर केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशीर्वाद घेतल्यानंतर आता माखनलाल सरकार कोण अशी चर्चा रंगली आहे.
माखनलाल सरकार हे राष्ट्रवादाच्या चळवळीशी जोडले गेलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. १९५२ मध्ये काश्मीरध्ये तिरंगा फडकवल्याच्या आंदोलनावेळी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत असल्यानं त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात ते काही काळ तुरुंगातही होते.
१९८०मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यात ते संघटनात्मक समन्वयक म्हणून काम करत होते. एक वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार सदस्यांना पक्षात आणलं होतं. १९८१ पासीन सलग ७ वर्षे ते जिल्हाध्यक्ष होते. तेव्हा भाजपमध्ये नेत्याला कोणत्याही एका संघटनात्मक पदावर दोन वर्षापेक्षा जास्त काळ नियुक्त केला जात नसे. पण माखनलाल हे अपवाद ठऱले होते.
