
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
लक्ष ३६३९ असताना ४२८८ मातांना मिळाला लाभ
जव्हार: जव्हार तालुक्यात तालुका आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री ‘मातृवंदना’ योजनेची सरस अंमलबजावणी झाली आहे,विशेष म्हणजे तालुक्यातील लक्ष हे ३६३९ असताना ४२८८ मातांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.ही ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील विशेष बाब असल्याचे बोलले जात आहे.यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची संपूर्ण आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहेत.
मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते.२०१७ ते २०२२ या कालावधीत तालुक्यातील ४ हजार २८८ गरोदर मातांची नोंदणी झाली आहे.या योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यांची संख्या वाढली आहे.शिवाय तीन टप्प्यात ५ हजार रुपये खात्यावर जमा होत असल्याने माता व बालकाच्या आरोग्यासाठी हिताचे आहे,तसेच या योजनेमुळे बाळाच्या लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे.
गरीब महिलांना गरोदरपणात शेवटच्या टप्प्यापर्यंत व प्रसूती झाल्यावर लगेच मोलमजुरी करावी लागते.त्यामुळे माता व बालकांच्या प्रकृतीला धोका होऊन माता व बालमृत्यू होण्याची शक्यता बळावते.याची दखल घेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केलेली आहे.या योजनेचा लाभ तीन टप्प्यांमध्ये दिला जातो.
यासाठी गरोदर महिलेने शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.शासकीय अथवा निमशासकीय सेवेत काम करणाऱ्या व मातृत्व रजेचा लाभ घेणाऱ्या महिलावगळता इतर सर्वांना या योजनेचा लाभ दिला जातो.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी साठी काय आवश्यक
गरोदर महिलेचे व तिच्या पतीचे आधार कार्डवरील माहिती व फोटो स्पष्ट व सविस्तर असावा,आधार नंबर स्पष्ट दिसणे अपेक्षित आहे,महिलेचे खाते हे राष्ट्रीयीकृत बँकेत असणे बंधनकारक आहे,जेणे करून लाभार्थ्यांना लाभ देताना कोणत्याही स्वरूपाची अडचण निर्माण होणार नाही.माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही अतिशय लाभदायक ठरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेने केवळ नोंदणी करायची आहे.आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक,आरोग्यसेविका यांच्याकडे नोंदणी करता येते. पात्र असलेल्या जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
अधिक शारीरिक क्षमतेचे काम केल्यामुळे अशा मातांची बालके कमी वजनाची जन्माला येतात व कुपोषणाचे सत्र मातेपासून बालकांपर्यंत रीतसर ओढवले जाते.
डॉ.किरण पाटील,तालुका आरोग्य अधिकारी,जव्हार