
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी- श्रीकांत नाथे
मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग २८ मे रोजी अमरावतीत
अमरावती :-स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग शनिवार दि.२८ मे रोजी अमरावती येथे उपस्थित राहून नागरिकांची मते जाणून घेण्याबरोबरच व्यक्ती,संस्थांकडून निवेदनेही स्वीकारणार आहे.नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत व निवेदन सादर करण्यासाठी व्यक्ती व संस्थांनी आपल्या नावाची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात करावी,असे आवाहन आयोगाचे सदस्य सचिव पंकजकुमार यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका,नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.
याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार आयोगाचे सदस्य अमरावती येथे शनिवार दि.२८ मे २०२२ रोजी सकाळी ९:३० ते सकाळी ११:३० दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित असतील.यावेळी आपले निवेदन देण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोगाचा इतर विभागांतील भेटीचा कार्यक्रम
सपर्पित आयोगाच्या विभागवार भेटीच्या कार्यक्रमानुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत,औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात २२ मे रोजी सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत,कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी दुपारी २:३० ते ४:३० या वेळेत तसेच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.