
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे :मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले. राज हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीच्या कामानिमित्त दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज हे पुस्तक खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र बाजीराव रस्त्यावरील एका पुस्तकाच्या दुकानात जात असताना राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असं म्हणत त्यांना कॅमेरे बंद करायला लावले . हा सर्व घटनाक्रम कॅमेरात कैद झाला असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
झालं असं की, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तक खरेदी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान, याठिकाणी राज ठाकरे येणार म्हणून प्रसारमाध्यमांच्या काही लोकांनी गर्दी केली होती. गाडीतून उतरल्यानंतर राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले. ते त्यांना म्हणाले कि,”बंद करा ते कॅमेरे, मला मनासारखे जगू द्याल की नाही?” नंतर पत्रकारांनी राज यांना मोकळी वाट करून दिली.