
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे तात्पुरती सूत्रे सोपवून येथील विभागीय आयुक्त पीयूष सिंह हे आगामी सोमवार २३ मे रोजी पदभार सोडणार आहेत.पीयूष सिंह यांची गेल्या आठवड्यातच केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागात बदली झाली आहे.सोमवारनंतर ते त्या विभागाचे सहसचिव म्हणून दिल्लीत नवी जबाबदारी स्वीकारतील.दरम्यान,अमरावती विभागाचे नवे आयुक्त म्हणून कोण येणार?याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
केंद्र शासनाने पियुष सिंह यांच्या बदलीचे आदेश गेल्या आठवड्यातच जारी केले.त्याला अनुसरून राज्य शासनाकडून स्वतंत्र आदेश (मुव्हमेंट आर्डर) जारी करावे लागतात.अद्यापपर्यंत ते जारी झाले नाहीत.परंतु येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्यानेच आयुक्त महोदय सोमवारी पदभार सोडतील,असे सांगितले जाते.सध्या आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्तांचे पद रिक्त आहे.उर्वरित इतर अधिकाऱ्यांमध्ये कुणीही आय.ए.एस नाही.त्यामुळे आयुक्तांचा पदभार हा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे सोपवला जाणार आहे.नवा अधिकारी येईपर्यंत त्यांना हा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागेल.दरम्यान,त्यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या जागेवर अमरावती-यवतमाळात जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले राहुल रंजन महिवाल,डीसाआर (विभागाय उपायुक्त) तथा महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले अरुण डोंगरे यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा आहे.
अमरावतीत अनेक पक्ष व विचारांचे लोकप्रतिनिधी असतांनाही त्यांनी योग्य समतोल साधला.खासदार,आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य वेगवेगळ्या विचारसरनीचे असतानांही त्यांना कधी कुणाशी कटूता येऊ दिली नाही.सर्वापासून समान अंतर हे त्यांचे यशस्वी सूत्र होते.आयुक्त या नात्याने अमरावती आणि अकोला महापालिकेसह दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांचे कामकाजही त्यांना नियंत्रित करावे लागले.परंतु त्या कामकाजादरम्यानही कधी पेचप्रसंग निर्माण होऊ दिला नाही.
सर्वाधिक काळ सेवा देणारे आयुक्त
सर्वाधिक काळ सेवा देणारे पीयूष सिंह हे आजपर्यंतचे एकमेव आयुक्त आहेत.तीन वर्षाच्या नियत कालावधी पेक्षा तब्बल दोन वर्षे अधिक अशी त्यांची कारकीर्द आहे.१९ जून २०१७ साली ते विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले होते.येत्या १८ जूनला त्यांना पाच वर्षे पुर्ण झाली असती;परंतु त्याच्या एक महिना आधीच त्यांची दिल्ली येथील केंद्रीय उर्जा विभागात बदली झाली आहे.