
रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटील भडकले !
गौतमी पाटील अपघात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्यामुळे शहरातील विरोधी नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होता आहे. अशातच, रोहित पवार यांनी पाटील यांचा डीसीपींना केलेला कॉल व्हायरल झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ शेअर करत टीका केली.
रोहित पवारांनी गुंड निलेश घायवळ प्रकरणात पोलिसांना विचारणा का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी संताप व्यक्त केला. ‘तू तुझी पत सांभाळून राहा. मला रोहित पवारने शिकवावं एवढी माझ्यावर वाईट वेळ आलेली नाही. अशा शब्दात टीका केली.
पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांना रोहित पवारांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा केली असता. पाटील चांगलेच संतापले. “रोहित पवारला काय काम धंदा आहे का? तो लगेच नेता व्हायला चालला आहे. तू तुझी पत सांभाळून राहा. मला रोहित पवारने शिकवावं एवढी माझ्यावर वाईट वेळ आलेली नाही” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
तसेच, घायवळ प्रकरणात मी काय केलं हे सांगत फिरू का? त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस विनाकारण निघाली का? असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?
तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.
गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!
आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात? असा सवाल उपस्थित केला होता.