
‘व्होट चोरांचे’ मोबाईल भाजप कार्यकर्त्याचेच !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर व्होट चोरीच्या आरोप करून संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. निवडणूक आयोगाने यासाठी मदत केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयोगाने त्यांना आरोप सिद्ध करण्याचे आवाहन राहुल गांधी यांना केले आहे.
दुसरीकडे आयोगावरचे आरोप भाजपचे नेते खोडून काढताना दिसत आहे. यातच राहुल गांधी यांच्या आरोप खरे असल्याचे काही पुरावे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात आढळले आहेत. या मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक भाजप कार्यकर्त्याशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. हे बघता व्होट चोरीचा मुद्दा आणखीच तापणार असल्याचे दिसून येते.
राहुल गांधी यांनी आपल्या लेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठोपाठ राजुरा विधानसभा मतदारसंघात व्होट चोरी झाल्याचा आरोप केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी एक ते १५ ऑक्टोबर या दरम्यान ११ हजार ६६७ बोगस मतदार नोंदणी केल्याची तक्रार काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारी नंतर ६ हजार ८५३ मतदार वगळण्यात आले होते. याची तक्रार तहसीलदारांनी पोलिसात केली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे तीन हजार मतांनी विजयी झाले. धोटे हे पराभूत झालेत. या काळात पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या बोगस मतदार नोंदणीसाठी वापरण्यात आलेले आयपी ॲड्रेस आणि ओटीपीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केली होती.
मात्र निवडणूक आयोगालने पोलिसांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले होते. मात्र राहुल गांधी यांच्या आरोपानंतर पुन्हा हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. धोटे यांची शंका बळावली. त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन या घोळाची माहिती सादर केली. राजुराच्या पलिसांनी केलेल्या तक्रारीत काही मोबाईल क्रमांकांच उल्लेख आहे. मात्र त्याची चौकशी केली जात नसल्याने वरूनच निवडणूक यंत्रणेवर दबाव असल्याचे बोलले जाते.
या मतदार संघातील तिसऱ्या क्रमांवर असलेले शेतकरी संघटनेचे उमेदवार व माजी आमदार वामनराव चटप यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. पोलिस तक्रारीत नमूद असलेले मोबाईल क्रमांक मिळवले. ते भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे असल्याचे आढळून आले आहे. असे असताना पोलिस त्यांना चौकशीला बोलवत नसल्याचा आरोप चटप यांनी केला आहे. त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचा उल्लेख करून पोलिस तक्रार केली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.