
जयंत पाटलांचा विषयच काढला निकाली…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत अत्यंत आक्षेपार्ह टीका केल्यानं भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
खुद्द शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत पडळकरांविरोधात निषेध सभाही घेतली होती.
पण त्यानंतरही चार दिवसांपूर्वीच पडळकरांनी सांगलीतील एका सभेत पुन्हा जयंत पाटलांवर दर्जाहीन शब्दांत आगपाखड केली होती. पण आज पत्रकारांशी बोलताना जयंत पाटलांसंबंधीच्या एका प्रश्नावर बोलण्यास पडळकरांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळं पडळकरांना भाजपतील वरिष्ठांकडून कडक शब्दांत समज दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पडळकर काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना गोपिचंद पडळकर यांना राजारामबापूंच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतल्यासंदर्भात आणि अजित पवारांनी पडळकरांनी वापरलेल्या भाषेबाबत मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली होती, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताच पडळकर म्हणाले, “हे बघा या विषयावर मी काहीच बोलणार नाही. माझा विषय त्या दिवशीच संपला आहे इशारा सभेनंतर त्यामुळं हा विषय आता माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा नाही. बाकीचा काही विषय असेल तर मला विचारा अन्यथा या प्रश्नावर मी एका शब्दानं बोलणार नाही.
दरम्यान, जयंत पाटलांवर कालपर्यंत तुटून पडणारे पडळकर शांत झाले आहेत. म्हणजेच भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांना कडक शब्दांत समज देण्यात आली असावी अशी चर्चा सुरु झाली आहे. पण खरंच अस असेल तर भाजपच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल घेतली गेल्यानं यानिमित्त महाराष्ट्रात खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पण्या करण्याला सध्यातरी चाप बसेल असं मानायला यामुळं हरकत नाही.