
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा : दि.२१.इसरूळ येथे बोटीद्वारे अवैध रेती उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. अशा प्रकारे बोटीद्वारे रेती उत्खनन करणार्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मित्र मनोज जाधव यांनी चिखली तहसिलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.देऊळगांवराजा तहसिलच्या सरहद्दीवर बोटीद्वारे अवैधरित्या मोठया प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी इसरूळ येथील सरपंच यांनी तहसिलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. तरीही आजरोजी गावकर्यावर दबाब टाकून रेती उपसा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी चिखली तहसिलचे नायब तहसिलदार यांनी रेतीने भरलेला गाडयावर कारवाई न करता समज देऊन सोडून दिल्या. तसेच इसरूळ येथे रेती उपसा करणारी बोट, रेती भरणारी जेसीबी व दोन टिप्पर पकडून सोडले.
तहसिलदार अजितकुमार येळे यांनी कारवाई करून रेती उपसा करणारे साहित्य, लोखंडी पाईप जप्त केले. परंतु उपसा करणार्यावर कारवाई न केल्याने व रेती उपसण्याची बोट देखील जप्त न केल्याने त्यांनी लगेच दुसर्या दिवशीच बोटीद्वारे परत रेती उपसा सुरू केला. याबाबत अधिकार्यांना माहिती देवून बोट जप्त केल्या जात नाही असा प्रश्न सरपंचासह गावकर्यांनी उपस्थित करून याबाबत चौकशी करून अवैध उत्खनन करणार्या बोटीवर जप्तीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.