
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:-महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संघ आणि शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम च्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय उस्मानाबाद जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.बी. चंदनशिव व श्री.शंकर खामकर यांनी केले आहे .
अधिक माहिती की, मंगळवार दिनांक 31 मे, 2022 रोजी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती यानिमित्ताने भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय येथे महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात नव साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारे महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या उस्मानाबाद जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे .
या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत पडळकर, उद्घाटक म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, लातूरचे विभागीय माहिती व उपसंचालक यशवंत भंडारे, चित्रपट व नाट्य लेखक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त शिवा करडे, चित्रपट अभिनेते अनेक मालिकेतील कलाकार वैभव बेलसरे, सिनेअभिनेता साहित्यिक राजेंद्र उगले नाशिक, चंद्रकांत मिसाळ पुणे, भानुदास धोत्रे परभणी, कुचेकर पाटील पुणे, आकाश महालपुरे जळगाव, ओमप्रकाश कांबीलकर औरंगाबाद, प्रशांत घोडके सोलापूर, श्याम ठाणेदार दौंड पुणे, श्रीमती अन्नपूर्णा भंडारे गट शिक्षण अधिकारी तथा साहित्यिक लातूर तसेच श्रीमती सरिता कलढोणे जुन्नर उत्तर पुणे, परशुराम नागरगोजे, दत्ता पवार अहमदनगर, श्रीमती सुरेखा खोकले नागपूर, सुरेश मंत्री अंबाजोगाई, दिलीप कांबळे उस्मानाबाद, चंद्रकांत झटाळे अकोला, लोमेश तांदळे बीड, सुरेश तळेकर, संतराम जोगदंड गेवराई या साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे. साहित्य संमेलनात चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्याच बरोबर या संमेलनात नव साहित्यिकांना स्वरचित साहित्य सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. यातील उत्कृष्ट स्वरचित साहित्यास प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्यांना सन्मान चिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
याशिवाय अनाथ बालकांसाठी काम करणारी व्यक्ती – संस्था, धार्मिक कार्यातून प्रबोधन करणारे प्रबोधनकार तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तीस देखील अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे .
या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संघाची नवीन चळवळ महाराष्ट्रात सुरू केली जात आहे . या चळवळीची सुरुवात भूम येथील साहित्य संमेलनातून केली जाणार आहे. या माध्यमातून ही चळवळ 11 जिल्ह्यात एकाच दिवशी जाणार आहे. उपस्थित साहित्यिक आपापल्या जिल्ह्यात या संघाची चळवळ वाढवणार आहेत. या नवीन व्यासपीठावरून नवसाहित्यिकारांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे . याशिवाय साहित्यिक चर्चा केली जाणार आहे .
या एक दिवसीय साहित्य संमेलनास जिल्ह्यातील बहुसंख्य साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक प्राचार्य डॉ.एस. बी. चंदनशिव, शंकर खामकर, प्रा.जी.यू तिजारे, अलीम शेख, शंकर माळी, मुख्याध्यापक तात्या कांबळे आदींनी केले आहे .