
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.यानंतर ऐनवेळी चौथ्या जागेसाठी उमेदवाराला मैदानात उतरवून भाजपनं डाव टाकला आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा मैदानात उतरले आहेत. चंद्रा हे मैदानात उतरल्यामुळं काँग्रेसची कोंडी झाली आहे.
राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामत जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.
नक्वी, अकबर, इस्लाम यांना डच्चू!
राज्यसभेत आता भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसणार
राज्यसभेच्या 15 राज्यांतील 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. यात सर्वाधिक म्हणजे आठ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भाजपने या राज्यातून आठ जणांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे राज्यनिहाय उमेदवार ः मध्य प्रदेश – कविता पाटीदार, सुमित्रा वाल्मिकी, कर्नाटक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जग्गेश, लहरसिंह सिरोया, महाराष्ट्र – वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राजस्थान – घनश्याम तिवारी, उत्तर प्रदेश – लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधामोहन अग्रवाल, सुरेंद्रसिंह नागर, बाबूराम निषाद, दर्शना सिंह, संगीता यादव, मिथिलेश कुमार, के.लक्ष्मण, उत्तराखंड – डॉ. कल्पना सैनी, बिहार – सतीशचंद्र दुबे, शंभू शरण पटेल, हरियाना – कृष्ण लाल पवार, झारखंड – आदित्य साहू