
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मूलनासाठी दंडात्मक कारवायांचे प्रमाण वाढवतानाच प्लास्टिकला पर्याय ठरू शकतील अशा साधनांच्या वापराबद्दल अधिकाधिक जनजागृती करावी,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले.
‘सिंगल युज प्लास्टिक बॅन’च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाली,त्यावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी धनश्री पाटील,एम.आय.डी.सी.चे कार्यकारी अभियंता राहूल बनसोड यांच्यासह महापालिका,विविध नगरपालिका,पंचायत समित्या यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बिजवल म्हणाले की,सार्वजनिक ठिकाणी,तसेच इतरत्रही प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात विखुरलेला दिसून येतो.पावसाळा जवळ आला असून सफाईच्या दृष्टीने प्लास्टिक निर्मूलन नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे.ठिक-ठिकाणी विखुरलेल्या प्लास्टिकमुळे नाल्या तुंबण्याचे प्रकार घडतात.त्याशिवाय जनावरांकडून नकळतपणे हा कचरा गिळंकृत होत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची हानी होते.अधिनियमाद्वारे सुस्पष्टपणे बंदी घातलेली असतानाही कुठे उल्लंघन होत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी.कारवाईचे प्रमाण वाढवतानाच पर्यायी साधनांच्या वापराबाबत जनजागृतीही प्रभावीपणे झाली पाहिजे.
श्रीमती पाटील म्हणाल्या की,सिंगल युज प्लास्टिकच्या उत्पादन व साठवणूकीवरील बंदीबाबत नियमांत सुस्पष्टपणे तरतुदी करण्यात आल्या आहेत.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याचे काटेकोर पालन करावे.कारवाईत जप्त करण्यात आलेले प्लास्टिक अधिकृत ‘रिसायकलर’कडूनच नष्ट झाले पाहिजे.त्याचे नियम पाळून कार्यवाही करावी.केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने अद्ययावत पोर्टल सुरु केले असून,त्यावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी,असे निर्देशही त्यांनी दिले.