
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :– ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी कर्ज मित्र ही योजना राबविण्यात येत आहे.शेतकरी बांधवांना सुलभ व जलदरीत्या पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कृषी कर्ज मित्र सहाय्यकारी ठरेल,असे जि.प.कृषी विकास अधिकारी देशमुख यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीसाठी राष्ट्रीयकृत बँका,सहकारी तसेच खासगी बँकांमार्फत कर्जपुरवठा होतो.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येतो.सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसासट्यांमार्फत कर्जवितरण होते.कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना सातबारा उताऱ्यांपासून बँकेची नाहरकत प्रमाणपत्रे आदी अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात.त्यात बराच वेळ जातो.कधी-कधी हंगामही संपून जातो. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कर्ज मिळत नाही.नाईलाजाने त्याला सावकाराकडून अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागते. हे टाळण्यासाठी कृषी कर्ज मित्र ही योजना राबविण्यात येणार आहे.
एकूण लागवडीखालील क्षेत्र व पीक कर्ज वितरण पाहता त्यात तफावत आढळून येते.ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे,ते केवळ कर्जप्रक्रियेच्या अज्ञान व वेळेच्या अभावामुळे वंचित राहतात.अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सुलभतेने मिळण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी या योजनेतून कृषी कर्ज मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कृषी कर्ज मित्र काय करतील?
कृषी कर्ज मित्र ज्या शेतकरी बांधवांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे,त्यांना भेटून कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देतील.कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्याच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करतील व मंजुरीसाठी बँकेकडे सादर करण्यास मदत करतील.कृषी कर्ज मित्र हा बँक आणि शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ नव्हे,तर मदतनीस आणि सल्लागाराची भूमिका बजावेल.शेतकरी बांधवांना पारदर्शी व प्रामाणिकपणे मदत व सल्ला देण्याची कृषी कर्ज मित्राची जबाबदारी असेल.तसे बंधपत्र त्याला द्यावे लागेल.
निवड प्रक्रिया अशी असेल
कृषी कर्ज मित्रांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.कृषी कर्ज मित्र म्हणून काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले अर्ज पंचायत समितीत कृषी विभागाकडे तत्काळ सादर करावेत.पंचायत समितीकडून छाननी होऊन हे अर्ज जि.प.स्तरावर येतील व निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.एका तालुक्यात साधारणत: दहा किंवा आवश्यकतेनुसार नियुक्त्या होतील.
तालुकास्तरीय समितीही गठित
कृषी कर्ज मित्रांना सेवाशुल्क अदा करण्यासाठी व कामाच्या संनियंत्रणासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येत आहे.तालुक्याचे गटविकास अधिकारी समितीचे अध्यक्ष व पं.स.सामान्य कृषी अधिकारी सदस्य सचिव असतील.सहायक सहकारी संस्था निबंधक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी,जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी,तालुका कृषी अधिकारी आदी सदस्य असतील.कृषी कर्ज मित्रांना अल्पमुदतीच्या कर्जांतर्गत प्रथम कर्ज प्रकरणी प्रतिप्रकरण दीडशे रूपये सेवाशुल्क मिळेल.मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जांतर्गत नवीन कर्ज प्रकरणी अडीचशे रूपये व कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण असल्यास दोनशे रूपये सेवा शुल्क मिळेल.
कृषी कर्ज मित्र शेतकऱ्यांच्या शिफारसीसह सेवाशुल्काची मागणी बँकेकडे सादर करेल व बँकेकडून त्याची शहानिशा होऊन पंचायत समितीला शुल्क अदा करण्यासाठी सादर करण्यात येईल.या योजनेत इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन जि.प.प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अविश्यांत पंडा यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.