
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेत तब्बल २२ वर्षांनी सर्व शालेय मित्र असलेले माजी विद्यार्थी एकत्र आले व पुन्हा एकदा शाळा भरली. हा स्नेहमेळावा प्राचार्य बी ए वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्रेनिक शहा व कैलास कदम हे होते.
यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला व तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
एकमेकांचे बदलेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल २२ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. इंदापूर येथील रयत हायस्कूलमध्ये १९९५ ते २००० या कालावधीत पाचवी ते दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक – एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला.
या कामासाठी अमोल जाधव, संतोष शिंदे, मनोज बागडे, प्रवीण ननवरे, बाळासाहेब पाटोळे, अश्विनी देवकर, शुभदा गुंडगिरी,जावेद शेख, गौरी साठे, मैनुद्दीन मोमिन, विश्वास खरमाडे,अरूण शिंदे, नितीन सोनवणे, कृष्णा जाधव,अमजद शेख, आझाद शेख, परमेश्वर मखरे, नितीन गायकवाड, सचिन शिंदे, अमोल साठे, व इतरांनी त्यांना मदत केली. सर्व वर्ग मित्रांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर गेट-टू-गेदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरले. यानुसार एक दिवसीय ‘दिल दोस्ती दुबारा-२०००’ हा गेट-टू-गेदर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच खेळ, गप्पा, मस्ती करण्यात आली.
यानंतर सर्वांनीच इंदापुर येथील रयत शाळेत येऊन आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच मागील २२ वर्षाच्या काळातील आपापल्या आयुष्यातील सुखदुःखाचे प्रसंग यावेळी एकमेकांशी शेअर केले. यानंतर शिक्षणाच्या वेळी ज्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असे या शिक्षकांना निमंत्रित करून त्यांचा शाळेत शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.या नंतर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे जेवण करून एकमेकांनचा निरोप घेतला यावेळी बरेच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
या सर्व माजी विद्यार्थी यांच्या वतीने रयत शिक्षण संस्था इंदापुर या संस्थेच्या सर्व परिसरामध्ये स्वखर्चाने ४५०००हजार रूपये खर्च करून सी. सी. टी.व्ही.व एल. ई.डी. स्क्रीन बसवून देण्यात आली आहे.