
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश नामदेव माने
जालना शहर अधिक सुंदर व पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रत्येकाने उपक्रमात सहभागी होत श्रमदान करण्याचे आवाहन
जालना दि.12 (जिमाका) : जालना शहरापासून जवळच असलेल्या पारशी टेकडी येथे समस्त महाजन, मुंबई व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित 65 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाने करण्यात आला. जालना शहराला अधिक सुंदर व पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक जालनावासीयांनी या उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवून श्रमदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी महाजन ट्रस्ट, मुंबईचे उदय शिंदे, उद्योजक सर्वश्री सुनील रायठठ्ठा, शिवरतन मुंदडा, रामेशभाई पाटील, नितीन काबरा, अमर लाहोटी, महावीर जंगीड, उमेश बजाज, संजय राठी, डॉ.राजीव जेथलिया, हितेश रायठठ्ठा, विनीत सहानी, डॉ.पंडित वासरे, डॉ.नितीन खंडेलवाल, प्रशांत वरुडे, बजरंग जोशी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, जालन्यात पर्यावरणाच्यादृष्टीने तसेच एक पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी जालन्यातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अतिरिक्त औदयोगिक वसाहत क्षेत्र 3 येथे असलेल्या पारशी टेकडी येथे 65 हजार वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होण्याबरोबरच जालनावासीयांसाठी एक पर्यटनस्थळ विकसित होणार असल्याने या उपक्रमात प्रत्येकाने सहभाग नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी यावेळी केले.