
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – अहमदनगर जिल्ह्यातील बाभळेश्वर ता.राहता येथे दोन ते सहा जून दरम्यान झालेल्या आंबा महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात गुरुवार ते सोमवार या दरम्यान माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा महोत्सव आणि कृषी प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनात इतर प्रकारामध्ये हापूस,तोतापुरी, गुजरात केशर, राजापुरी, मल्लिका, रत्ना, एलिफंटा, क्वीन, श्री गणेश असे जवळपास 110 वाण या वेळी शेतकऱ्यांचे व ग्राहकांचे मुख्य आकर्षण ठरले. दीड ते दोन किलोचा आंबा व विविध योजनांची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली होती.
आंबा पिकापासून अनेक प्रकारे प्रक्रिया करता येतात भविष्यात प्रक्रिया उत्पादनास चालना देण्यासाठी फ्रोजन पल्प, आंब्याची पोळी, बर्फी, आरटीएस शीतपेय, फळांच्या फोडी, कॅंडी, गुळांबा तसेच पन्ह इत्यादी पदार्थ यावेळी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. कृषी प्रदर्शनामध्ये विविध रोपे रासायनिक,खते, बी-बियाणे, अवजारे, सिंचन साहित्य, सेंद्रिय खते, छोटी अवजारे याचाही समावेश होता. या प्रदर्शनातून अनेक अपरिचित जातींचे आंबे शेतकऱ्यांना माहिती व्हावे व आंबा पिकाखाली वाढते क्षेत्र लक्षात घेऊन आंब्याची सुधारित पद्धतीने शेतामध्ये पिकवन करून, विक्री केली तर आंबा उत्पादकांना चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो असे या वेळी उपस्थित मान्यवरांकडून सांगण्यात आले. महिला उत्पादकांनी पुढाकार घेऊन प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले तर यशाची वाटचाल होईल. आंबा प्रक्रियेचे प्रशिक्षण आणि प्रकल्प अहवाल कृषी आंबा उत्पादक आणि महिलांसाठी पुरवण्यात येईल, असे बोलताना डॉक्टर संभाजी नालकर यांनी सांगितले.
मुघलकालीन असलेला हुर आंबा, राजापुरी, पारनेरचा टिकल्या आंबा असे लुप्त होत चाललेल्या प्रजाती व अनेक प्रकारचे आंब्याच्या प्रजाती शेतकऱ्यांनी व महिला बचत गटा पर्यंत पोहचाव्या व यातून आंबा उत्पादन करून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यशाकडे वाटचाल करावी.
डॉ. संभाजी नालकर
(वरिष्ठ शास्त्रज्ञ)