
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-किशोर वाकोडे
बोराखेडी( मोताळा) : दि.१५. जुगारावरील छाप्यावरून मोताळा तालुका बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील आणि एएसआय राजेश आगाशे यांच्यात चांगलीच जुंपलीय.या प्रकरणात तुम्ही ६० हजार रुपये घेतले आणि एसपी साहेबांनी तुमची चौकशी करायला सांगितले आहे, असे ठाणेदार पाटील यांनी एएसआय आगाशे यांना म्हटलंय. या बाबतची पोस्ट, कारवाईचा व्हिडीओ, दोन आरोपींचा जबाब सह इतर मजकूर आगाशे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ठाणेदारांप्रती संताप व्यक्त केलाय. तसेच मी पैसे घेतल्याचे सिद्ध करून दाखवा, असं चॅलेंजही केलंय. तर, ठाणेदार पाटील यांनी या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य काय ते समोर येईल असं म्हटलंय. दरम्यान, ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यामधील हा वाद खूप तापला असून, त्यामुळे बोराखेडी पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
नेमकं काय प्रकरण?
बोराखेडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय राजेश आगाशे सह इतर तीन कर्मचाऱ्यांनी १० जूनला लोखंडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगारावर छापा मारला होता. यावेळी चार जणांना पकडले होते. त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, रोख ३०६० रुपये आणि २० रुपयांचा ताशपत्ता असा एकूण ८३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला होता.
आरोप काय?
दरम्यान, मोताळा बिट अंमलदार राजेश आगाशे यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात ६० हजार रुपये घेतले असून, एसपी साहेबांनी तुमची चौकशी करायची सांगितले आहे, असे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी म्हटल्याचा दावा राजेश आगाशे यांनी केलाय. रविवारी सायंकाळी त्यांनी याबाबत पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. सोबतच पुरावा म्हणून जुगारावरील कारवाईचा व्हिडीओ आणि दोन आरोपींच्या जबाबाचे पत्र ही पोस्ट केलेत. तसंच मी जर पैसे घेतल्याचे खरं असेल तर सिद्ध करून दाखवा, असा चॅलेंज करणारा मजकूर सुद्धा पोस्ट केलाय. ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यामधील हा वाद सोशल मीडियावर धडकताच बोराखेडी पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
कोण काय म्हणालं?
दरम्यान, ठाणेदार पाटील यांनी आरोपींचा जबाब नोंद केला असून, एएसआय राजेश आगाशे यांनीसुद्धा आरोपींचा जबाब घेतलाय. आगाशे यांच्याकडे दिलेल्या जबाबात एका आरोपीने लिहून दिलेय की, ठाणेदार पाटील यांनी मला जुगार प्रकरणात जप्त केलेल्या पैशांबद्दल सखोल विचारपूस केलीय. त्यावेळी संबंधीत व्यक्तीने त्याच्याकडून १५०० रुपये जप्त केल्याचे सांगितले. यावर ठाणेदार राजेंद्र पाटील म्हणाले की, तुमच्याकडे नगदी २० हजार रुपये होते, असे सांगा. मी तुमची जुगारात पकडलेली दुचाकी सोडून देतो, असंही सांगितले. तेव्हा संबंधिताने माझ्याकडे पंधराशे रुपयेच होते. मी खोटं बोलत नाही. कोणाला फसवत नाही, असे म्हटल्याचा जबाब आगाशे यांच्याकडे दिलाय.
तर, दुसऱ्या आरोपीला बोराखेडी येथील एका व्यक्तीने सांगितले की, तू ठाणेदार पाटील यांना सांग की, आगाशेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी तुझ्याकडून ४० हजार रुपये घेतले. आपल्याला बिट जमादार आगाशे यांचा गेम करायचा आहे. त्यांची बिट काढायची आहे. यावर संबंधिताने सांगितले की, माझ्याकडून १२०० रुपये जप्त करण्यात आले असून ठाणेदारांनी विचारपूस करण्यासाठी बोलावले असता, पोलिसांनी त्याच्याकडून १२०० रुपये जप्त केल्याचे ठाणेदारांना सांगितले, असे जबाबात नमूद करण्यात आलंय. बिट अंमलदार राजेश आगाशे यांनी जुगार छाप्यातील कारवाईचा व्हिडीओ, आरोपींचा जबाब आणि इतर मजकूर व्हाट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करणे चुकीचे असून, त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप केलाय. सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य काय आहे, हे समोर येईल.
चौकशी सुरु
एकंदरीत जुगारावरील छाप्यात ६० हजार रुपये घेतल्याचा मुद्दा बुलडाण्यात चांगलाच तापलाय. यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य काय ते समोर आणण्याची गरज आहे, अशी मागणी केली जात आहे. बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या असून, अवैध धंद्यांना ऊत आलाय. त्यात जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याच्या मुद्द्यावरून ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यात जुंपलीय. त्यामुळे पोलिस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेलीत. बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जातेय. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.