
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.१५. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इडीनं नोटीस पाठवली. याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील, नांदुरा तालुका येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको करीत निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात केंद्रसरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे . भाजप सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी दि.१५ जुन २०२२ रोजी नांदुरा तालुका काँग्रेस च्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर आ. राजेशभाऊ एकडे यांच्या मार्गदर्शनात रास्ता रोको करुन जाहीर निषेध करण्यात आला.
आ.राजेश भाऊ एकडे यांच्या मार्गदर्शनात नारेबाजी करून मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते, राहुल गांधी यांना अटक झाल्यास आम्हाला जेल मध्ये टाका, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकार करत आहे .’मोदी सरकार काँग्रेस को डरती है ईडी को आगे करती है. राहुल गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ अशा प्रकारचे नारे देऊन रास्तारोको करण्यात आला.
तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष भगवानभाऊ धांडे यांनी मोदी सरकार विरोधात तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
रास्ता रोको करते समयी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तालुका काँग्रेस कमेटी, युवक काँग्रेस,महीला काँगेस आघाडी, एस सी सेल , सेवादल काँग्रेस सेल, ओ.बी.सी.काँग्रेस सेल,अल्पसंख्याक सेलसह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.