
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन नाही अशी बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्पष्ट केली आहे असा दावा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
आज सकाळीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील घडामोडी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालल्या आहेत असे ट्विट केले होते.
त्यामुळे शिवसेनेने सरकारवरील दावा सोडून देण्याची मानसिक तयारी केली असल्याचे व विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतल्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि असा कोणताही विचार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनीच नमूद केल्याचे पटोले यांनी आज स्पष्ट केले. आपण कार्यक्षमपणे सरकार चालवू असा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे.
पटोले म्हणाले की कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक कमलनाथ यांनी आज सकाळी फोन वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री करोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांच्याशी थेट बैठक होऊ शकली नाही असे ते म्हणाले. सध्याच्या संकटातून महाविकास आघाडीचे सरकार तरून जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे पटोले यांनी नमूद केले.
दरम्यान कॉंग्रेसचे 44 आमदार एकजूट असल्याचा दावा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की आम्ही बोलावलेल्या बैठकीला कॉंग्रेसचे 41 आमदार उपस्थित होते. तीन जण मुंबईकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आमची सदस्य संख्या कायम आहे असे त्यांनी सांगितले.