दैनिक चालु वार्ता पंढरपूर प्रतिनिधी -सुधीर आंद
विठ्ठल कारखान्याबाबतीत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं. म्हणून तर अजितदादांनीही संचालकांना बजावलेलं. आता कुणी कल्याणरावांचं
कान फुंकलं. खा. यांनाही कुणीतरी बजावलेलं. म्हणून तर खासदारसाहेब निवडणुकीपासून बाजूला झालेलं. विठ्ठलच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांचा पाडाव करण्याची भूमिका वरिष्ठ नेते मंडळींनी घेतली आहे. याचा फायदा कोणाला होणार ? हे ६ जुलै रोजी समजणार आहे.
विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी कारखान्यासाठी मतदान पार पडणार आहे. कधी नव्हती इतकी गर्दी या निवडणुकीत झाली आहे. तीन पॅनल होऊनही नाराज मंडळींची नाराजी दूर करता करता, पॅनल प्रमुखांच्या नाकी नऊ आले आहे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते मंडळींचे लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
मागील काही महिन्यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाच्या संचालकांना सुनावले होते. कारखान्यासाठी दिलेले पैसे कुठे गेले, हे आधी सांगा असा जाब भर सभेतच त्यांनी विचारला होता. एकंदरीत विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यावर वरिष्ठ नेते मंडळींची खप्पा मर्जी असल्याचे जाणवले आहे. काही दिवसापूर्वीच कुणीतरी वरिष्ठ नेत्याने कल्याणराव काळे यांना कानात काहीतरी सांगितले होते. याप्रमाणे वागण्याचा बेत कल्याणराव काळे यांनी आखला असता, पण त्यांनाही सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मोठी भीती आहे. यामुळेच ते भगीरथ भालके यांच्या व्यासपीठावर दिसत आहेत.
विठ्ठल परिवाराचे नेते समजले जाणारे भाजपाचे खा. धनंजय महाडिक या निवडणुकीपासून दूरच आहेत. त्यांनाही वरिष्ठ नेत्याने बजावले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामुळेच त्यांनी या निवडणुकीत भाग घेतला नाही.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला कल्याणराव काळे यांना देण्यात आला होता. परंतु सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. ही निवडणूक लढण्यासाठी भगीरथ भालके यांची कल्याणराव काळे यांना मोठी गरज आहे .यामुळेच प्रचारसभांमध्ये काळे यांचा सहभाग आहे. दुसरीकडे मात्र कल्याणराव काळे गटाची अनेक नेतेमंडळी अभिजीत पाटील यांच्या गटात सहभागी झाली आहेत. सैन्य एकीकडे सोडून कल्याणराव काळे भगीरथ भालके यांच्याबरोबर फिरत असल्याचे दिसत आहे.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांचा पाडाव करून, विठ्ठल परिवाराचा नेता निवडण्याचे मोठे काम वरिष्ठ नेतेमंडळी करीत असल्याचे दिसत आहे. यामुळेच अभिजीत पाटील आणि युवराज पाटील गटात निवडणुकीसाठी भलताच चेव चढला आहे. अभिजीत पाटील यांनी यापूर्वीच कारखाना निवडणुकीत चमत्कार घडणार असल्याचे बोलून दाखवले आहे. एकंदरीत भगीरथ भालके यांचा पाडाव करून विठ्ठल परिवाराचा नेता निवडण्याचे काम वरिष्ठ पातळीवरूनच सुरू आहे.
