
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
माळशिरस – आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळमृदंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊली… माऊली… नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय.
पुरंदावडे (ता. माळाशिरस) गावच्या हद्दीत अश्वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी हा सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला. उद्या (दि. 6) हा सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ होईल.
माऊली रथात विराजमान झाल्यानंतर सकाळी 6.30 वाजता सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सकाळी 9 वाजता सोहळा मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला व वारकऱ्यांनी दुपारचे भोजन उरकले. विश्रांतीनंतर दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सोहळा पहिल्या गोल रिंगणासाठी सदाशिवनगर नजीक पुरंदावडे गावच्या हद्दीकडे मार्गस्थ झाला.
दुपारी 2 वाजता माऊलींचे अश्व तर 3 वाजता लाखो वैष्णवांसह माऊलींचा पालखी सोहळा पुरंदावडे येथे पोहोचला. येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार ऍड. रामहरी रुपनवर, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.
अश्वांची नेत्रदीपक दौड…
दुपारी 3 वाजता रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली. जरीपटक्याच्या देवीदास लोंखडे यांनी ध्वजाने रिंगणाला 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर राजाभाऊ, रामभाऊ, बाळासाहेब या चोपदारांनी माऊली व स्वाराच्या अश्वांना रिंगणासाठी सोडले. सुरूवातीला काही वेळ स्वाराचा अश्व अग्रभागी राहिला. त्यानंतर माऊलींच्या अश्वाने नेत्रदिपक दौड करीत स्वाराच्या अश्वाला अर्ध्या फेरीतच मागे टाकत दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी माऊली।। माऊली।। नामाचा जयघोष करून हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवित सोहळ्याचा आनंद लुटला.
माऊलींचा अश्व चौखूर उधळला
माऊलींच्या अश्वाला आवरताना सेवकांची दमछाक झाली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यांमधून हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी हे मैदानी खेळ रंगले. त्यानंतर चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रीत केले. माऊलींना मध्यभागी घेऊन या दिंड्यांमध्ये टाळ, मृदंगाच्या साथीन आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्मचा उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते.