
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; त्यानंतर ते प्रथम नागपूरला गेले होते. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आता ते कामाला लागले असून पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेत आहेत. पुणे महापालिकेवर पूर्वी भाजपाची सत्ता होती. सध्या प्रशासन आहे. आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांची पुणे भेट महत्वाची मानली जाते. मविआ सरकारने प्रभाग रचना बदलून चार ऐवजी तीन नगरसेवकांचा प्रभाग केला आहे. ही प्रभाग रचना भाजपाला अडचणीची ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुणे भेटीत फडणवीस यांचेकडे भाजपा पदाधिकारी तक्रार करू शकतात. मुंबईनतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका महत्वाची आहे. त्यातच पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आगामी महापालिकेत निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सरळ व चुरशीचा सामना होणार आहे.