
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
शिक्षक वर्गाने धरला फुगडीवर ठेका, खेळल्या पाऊल्या बालगोपाळांचा दिंडी सोहळा श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम येथे पोहचल्यावर येथील विद्यार्थी आश्रमातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुगात हरिनाम गायले, या हरीनामात महिला शिक्षक वर्गाने सहभाग घेत फुगडी खेळत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
माऊलीच्या दर्शनाची आस ,समोर दिसे पांडुरंग
काढून दिंडी आनंदाने गातो भजन विठुचे ,
सुखी ठेव बाप्पा आम्हाला हेच मागणे आमचे .
आमची शाळा आहे ज्ञानकेंद्र आमचे ,
मिळते ज्ञानाची शिदोरी , बीज मिळते संस्काराचे
या काव्यपंक्तीला साजेल असा बालगोपाळांचा दिंडी सोहळा दि. ९ रोजी शिऊर येथील राजे संभाजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे आयोजित करण्यात आला होता निमित्त होते आषाढी एकादशीचे.
शिऊर (ता.वैजापूर) येथील राजे संभाजी इंग्लिश स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी आणि पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या दिंडीमध्ये शाळेतील बालकांनी विठ्ठल रुख्मिणी यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. गळ्यात टाळ, मृदंग, पताका, खांद्यावर पालखी तर लहान लहान मुली तुळशी वृंदावनासह यामध्ये सामील झाल्या होत्या.वारकरी संप्रदायाचा गणवेश परिधान करून दिंडीत सहभागी झालेले लहानगे सर्व ग्रामस्थांचे आकर्षण ठरले . विठ्ठल विठ्ठल जयहरी, जय जय रामकृष्णहरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम नामघोष करण्यात आला. बालकांना आपल्या संस्कृती, परंपराची तसेच सणांची माहिती मिळण्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मुख्याध्यापक रवींद्र पवार यांनी सांगितले. बालकांचा सर्वांगीण विकासाचा मूळ पाया म्हणजे शाळा असून अश्या उपक्रमांमुळे बालकांवर उत्तम संस्कार होत असल्याचे मत संस्थेचे प्रशासकीय आधिकारी प्रा.व्ही.के बोडखे यांनी व्यक्त करून या दिंडी सोहळ्याचे कौतुक केले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक रवींद्र पवार, शुभांगी आढाव, मोनल कायस्थ, हर्षदा लोंढे, दुर्गा चव्हाण, नबिना शेख, धनश्री ढवळे, जयश्री ठाकरे, सोन्याबापू सुर्यवंशी, वर्षा जाधव आदींनी परिश्रम घेतले.