
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
” मुसळधार पावसात शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली काही वेळात प्रचंड पूर आला, नदीशेजारी ठोकलेले तंबू वाहून गेले बोलता बोलता आमच्या डोळ्यासमोर माणसेही वाहून जाऊ लागली, आम्ही २०० फूट अलीकडे असल्याने वाचलो” ही काळजात थरकाप उडवणारी घटना अमरनाथ यात्रेसाठी गेलेले शिऊर येथील ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव यांनी सांगितली.
अमरनाथ येथील गुहेजवळ दि.८ रोजी सायंकाळी ढगफुटी झाली , महापूर आल्याने अनेक तंबू वाहून गेले, या प्रलयात १५ भाविक ठार झाले तर ४० हून आधिक भाविक बेपत्ता आहेत.
शिऊर येथील ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक बाळासाहेब जाधव, राजेंद्र दाभाडे, मच्छीन्द्र जाधव, टूणकी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील गोरे हे पाच जण शिऊर येथून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले आहेत, शुक्रवारी हा प्रलय झाला तेव्हा हे सर्व केवळ २०० फूट अलीकडे होते. शिऊर येथील या पाचही जणांच्या समोर हा भयंकर जलप्रपात झाला, ढगफुटीनंतर आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात अमरनाथ गुहेजवळील काही लंगर व राहुट्याही वाहून गेल्या, दरम्यान आम्ही सुखरूप असल्याचा निर्वाळा देत एनडीआरएफ, एसटीआरएफ, आणि आयटीबीपीची पथके बचाव आणि मदतकार्य करीत असल्याचे बाळा जाधव यांनी सांगितले.
अमरनाथ गुंफेजवळील बेस कॅम्पला ढगफुटीचा मोठा तडाखा बसला. शुक्रवारी सायंकाळी 5.30च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड हाहाकार उडाला. अतिवृष्टी आणि त्यात झालेली ढगफुटी यामुळे गुंफेजवळचा संपूर्ण परिसर पाण्याच्या लोटने व्यापून गेला. दुर्घटनेत अमरनाथ यात्रामार्गावरील सामुदायिक किचन आणि अनेक तंबूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्याच्या लोटात 25 हून अधिक तंबू वाहून गेले. यात 3 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील जखमींना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांमार्फत रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.