
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जुलै महिन्यातील जवळपास दहा दिवसांचा कालावधी होऊनही इंदापूर तालुक्यातील बहुतांश भाग तहानलेला आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिरायती भागातील शेती अडचणीत आली आहे. याशिवाय इंदापूर ला पाणीपुरवठा करणार्या वीर धरणातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे तसेच इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील तलावामधील पाणी साठा कमी असून त्यामुळे झगडेवाडी, तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा पिण्यासाठी होत आहे .तसेच शेती अडचणीत आली आहे.
चार दिवसांपूर्वी इंदापूर शहर आणि बागायती पट्ट्यात पाऊस झाला. मात्र, हा पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाला, तर जिरायती भागाला पावसाने हुलकावणी दिली. तालुक्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. उपलब्ध पाण्यावर शेतकर्यांनी बाजरी आणि सोयाबीन पेरणी केली आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरिपातील पेरण्या मात्र लांबणार आहेत. पाऊस लांबूनही उपलब्ध पाण्यावर अनेक शेतकर्यांनी खरिपातील पिके घेतली आहेत.
मात्र, परतीच्या पावसामुळे ही पिके वाया जाण्याची भीती शेतकर्यांना आहे. त्यामुळे वेळेत पाऊस झाला, तर पिके तरतील आणि त्यातून अपेक्षित उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्यांना आहे. पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील बहुतांश ओढे, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांचा चारा, वन्यप्राण्यांच्या चार्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे. एक-दोन मुसळधार पाऊस झाल्यानंतर या सर्व संकटातून शेतकरी बाहेर येणार आहे .असे झगडेवाडी गावातील नागरिक प्रल्हाद झगडे, विजय झगडे, बाळासाहेब झगडे, ॲड नितीन राजगुरू व इतर नागरिक यांनी मत व्यक्त केले आहे.