
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पावसाळा अनेक आजारदेखील घेऊन येतो.पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप,सर्दी,खोकला,जुलाब,अतिसार,उलट्या होणे.पावसाळ्यातील विषाणुजन्य व्याधी मलेरिया,हिवताप,स्वाईन फ्लू,डेंग्यू,चिकन गुनिया,कावीळ,कॉलरा.पावसाळ्यात आढळणारे जुनाट आजार सांधेदुखी,अस्थमा,आमवात,पचनाचे आजार,आम्लपित्त योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात जाणवते.हे आजार होऊ नयेत म्हणून आपण खालील काळजी घ्यावी.
🔸 पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे.
🔸 पालेभाज्या,फळे वापरतांना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात.
🔸 रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.
🔸 दूषित हवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी दररोज सकाळ,संध्याकाळ घरामध्ये वेखंड,गुग्गुळ इत्यादी औषधी वनस्पतींचा धूर करावा.
🔸 पावसाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लाते.अतिसार,मलेरिया,गोवर,कांजण्या या व्याधींचे प्रमाण लहान बालकांमध्ये पावसाळ्यात अधिक वाढलेले दिसते.हे टाळण्यासाठी मुलांना आयुर्वेदिक सीतोपलादी चूर्ण,अरविंदासव,महासुदर्शन काढा आदी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नियमित द्यावीत.
*हे लक्षात ठेवा*
🔹 दररोज सर्वांगाला तिळाचे तेल कोमट करून मसाज करणे व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.यामुळे स्नायू व हाडे बळकट होतात.त्वचेची कांती सुधारते,त्वचा मुलायम होते.
🔹 गाईच्या दुधात हळद,सुंठ व तुळशीची पाने उकळून नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते.
🔹 पावसाळ्यात तळलेले पदार्थ,आंबवलेले पदार्थ,शिळे अन्न,बेकरीचे पदार्थ,साबुदाणा,मसालेदार,चमचमीत अन्न,फास्ट फूड आरोग्यास हानिकारक आहेत.
🔹 फ्रिज मधील अतिथंड पाणी पिणे,कोल्ड ड्रिंक्स,आइसक्रीम यामुळे भूक मंदावते.सर्दी,खोकला यासारखे आजार लवकर होतात.
🔹 गुणांनी विरुद्ध असणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत.उदा.दूध-फळे एकत्र (शिकरण),मिल्क शेक,दूध व मासे,मांसाहारानंतर आइस्क्रीम.विरुद्ध आहात त्वचाविकार किंवा विषारी परिणाम करतात.
🔹 गरम पाणी व मध एकत्र पिऊ नये.
🔹 दररोज रात्री झोपताना १५ ते २० काळ्या मनुका खाल्ल्याने पोट साफ होते.
🔹 रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे यामुळे शरीर हलके राहते व वजन नियंत्रित राहते.
🔹 सांधेदुखी, वातव्याधी टाळण्यासाठी संपूर्ण अंगास महानारायण तेलाने मालिश करावे.
🔹 निरोगी राहण्यासाठी व शरीरातील वाढलेला वात कमी करण्यासाठी आयुर्वेद वैद्याकडून बस्ति हे पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते.
🔹 पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्याने भूक कमी होते.त्यामुळे जेवण कमी जाते व अशक्तपणा जाणवू लागतो.अशक्तपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर अनेक आजारांना बळी पडते.ही गोष्ट टाळण्यासाठी सुंठ घालून पाणी उकळून प्यावे.
🔹 दैनंदिन आहारामध्ये पचनाला हलके अन्नपदार्थ घ्यावेत.