दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
नांदेड :-नायगाव जि.नांदेड येथील मातोश्री कै.सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी कादंबरी विभागात कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या कोल्हापूर येथील सुनील देसाई यांच्या ’सप्तपर्व’ आणि सायन पब्लिकेशन प्रा.लि. पुणे यांनी प्रकाशित केलेल्या औरंगाबाद येथील डॉ. महेश खरात यांच्या ’बुर्गांट’ या कादंबरीला विभागून देण्यात आला आहे. तसेच कथा या क्षेत्रात डिंपल पब्लिकेशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या ’मी आहे’ या सुनील जाधव पालघर आणि पायगुण प्रकाशन अमरावतीने प्रकाशित केलेल्या ’दुष्टचक्र’ या वृषाली खैरनार, धुळे यांच्या कथासंग्रहाला विभागून देण्यात आला आहे. कविता या प्रकारात जळगाव येथील उषा हिंगोणेकर यांच्या ’धगधगते तळघर’ आणि पुणे येथील रवी भिसे यांच्या ’माझा निषेध झाला पाहिजे’ या काव्यसंग्रहाची विभागून निवड करण्यात आली.
बालसाहित्य विभागात दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या ’गुगलबाबा’ आणि मुंबई येथील बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या ’छंद देई आनंद’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक पुरस्कार या विभागात इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आनंद पुपलवाड यांच्या ’अभंग कुणब्याचे आणि इतर कविता ’ तसेच पंडित पाटील यांच्या ’गोड गाणी’ या पुस्तकांची निवड करण्यात आली. नायगाव तालुक्यातील भूमिपुत्रांना देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व्यंकट आनेराये यांच्या ’आम्हाला सौजन्याचा शाप’ या पुस्तकाला देण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागासाठी दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि स्थानिक पुरस्कारासाठी पाचशे रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक कौतिक कोळी, संपादक पांडूरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने या पुरस्काराची निवड केली आहे.
मातोश्री कै.सौ.केवळबाई मिरेवाड पुरस्काराचे संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी या पुरस्कारांची घोषणा मातोश्रीच्या पुण्यस्मरणदिनी 16 जुलै रोजी नायगाव येथे केली. लवकरच एका विशेष समारंभात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव पा. चव्हाण, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक कौतिक कोळी, समीक्षक डॉ. माधव पुटवाड, सेवानिवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड, प्राचार्य रमेश कदम यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
