पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
बोईसर:- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळत असताना, बोईसर शहरातही परंपरा आणि संस्कृतीचा देखणा आविष्कार अनुभवायला मिळाला. शहरात आयोजित भव्य शोभायात्रेमुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून भाविकांनी या दिवशी दिव्य आणि आकर्षक शोभायात्रेचे आयोजन केले. अवधनगर ते चिराग विद्यालय, भीमनगर या मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या शोभायात्रेतील महिला वर्गाचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. पारंपरिक मराठी वेशभूषेत सजलेल्या महिलांनी हातात गुढी घेत, ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत मराठी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण मिरवणुकीला वेगळीच शोभा प्राप्त झाली.
पुरुष वर्गानेही पारंपरिक पोशाखात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. तरुणाईनेही मोठ्या संख्येने उपस्थित राहत या उत्सवात रंग भरला. सर्व वयोगटातील नागरिकांनी एकत्र येत सणाचा आनंद द्विगुणित केला.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. घराघरांत उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. भगवान श्रीरामांच्या अयोध्येत पुनरागमनाच्या स्मरणार्थही या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
बोईसरमधील ही शोभायात्रा केवळ सण साजरा करण्यापुरती मर्यादित न राहता, मराठी संस्कृती, सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचा जिवंत उत्सव ठरली. शहराने नववर्षाचे स्वागत उत्साह, आनंद आणि परंपरेच्या साजिर्या रंगात केले.
